पुणे : पुणे ग्रामीण पोलिसांच्या एका महिला पोलीस अधिकाऱ्यानं, तब्ब्ल २ कोटी रुपयांच्या दरोड्याचा छडा शिताफीनं लावला आहे. लोणावळ्याहून ८ सप्टेंबरला सिगारेटचा अख्खा कंटेनर पळवून नेण्यात आला होता. या कंटेनरमध्ये एक कोटी ८७ लाख रुपये किंमतीच्या सिगारेट होत्या.
या धाडसी गुन्ह्याच्या तपासाचं मोठं आव्हान पोलिसांसमोर होतं. अनेक ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज, टेक्निकल डेटा आणि अशा प्रकारे या आधी झालेल्या गुन्हयांची माहिती घेत, पोलिसांनी आरोपींचा माग काढला. यात साधना पाटील यांनी महत्वाची भूमिका बजावत, या गुन्ह्यातल्या पाच आरोपींना अटक केली.
अटक करण्यात आलेले आरोपी मूळचे नगर जिल्ह्यातले आहेत. त्यांच्यावर या आधीही अनेक गुन्हे दाखल आहेत. साधना पाटील या महिला पोलीस अधिका-यानं ही कारवाई केली आहे. त्या पुणे ग्रामीण पोलीस दलात सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत आहेत.
तपास अधिकारी साधना पाटील यांच्या कामगिरीचं पोलीस अधीक्षक सुवेज हक यांनी विशेष कौतुक केलं आहे. तसंच साधना पाटील आणि त्यांच्या पथकाला १५ हजार रुपयांचं बक्षीसही जाहीर केलं आहे.