Mumbai Crime News: डोंबिवलीतील एक महिना मॉर्निंग वॉकसाठी सकाळीच घराबाहेर पडली. मात्र त्यानंतर ती घरी परतलीच नाही. खूप वेळ झाला तरी घरी परतली नाही म्हणून घरच्यांनी शोध घेतला. मात्र ती कुठेच न सापडल्याने अखेर त्यांनी पोलिस ठाणे गाठले. आज जवळपास 12 दिवस उलटून गेले आहेत. तरीदेखील महिलेचा शोध लागलेला नाहीये. या प्रकरणी पोलिस तिचा कसून शोध घेत आहेत. तर अचानक महिला बेपत्ता झाल्याने कुटुंबीयदेखील चिंतेत आहे.
सोनी दयानंद सिन्हा (47) असं या महिलेचे नाव आहे. डोंबिवलीतील सावरकर रोड परिसरात ती तिच्या कुटुंबासह राहत आहे. मात्र, एकाएकी ती बेपत्ता झाली. या प्रकरणी कुटुंबीयांनी रामनगर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. पोलिसही तिचा कसून शोध घेत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनी सिन्हा या मॉर्निंग वॉकसाठी घरातून बाहेर पडल्या होत्या. डोंबिवलीतीलच सावरकर रोडवर त्या गेल्या होत्या. नेहमी त्या एका तासात परत येत होत्या. मात्र दुपार होऊन गेली तरी त्या परत आल्या नाही.
आईला यायला खूप उशीर झाला त्यामुळं मुलांनी त्यांच्या वडिलांना फोन करुन आई अजून आली नसल्याचे सांगितले. त्यानंतर लगेचच महिलेचा पती घरी आला आणि त्यांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र, त्याचवेळी महिलेचा मुलगा तिला सतत फोन करत होता. पण फोन लागत नव्हता. त्यानंतर त्याने तिला व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून संपर्क साधला तेव्हा तिने सांगितले की, ती लोकल ट्रेनमध्ये आहे आणि तिच्या फोनची बॅटरी लो आहे. फोन कधीही स्विच ऑफ होऊ शकतो. त्यानंतर सोनी यांचा फोन सतत स्विच ऑफ दाखवत होता. तिला कित्येकदा फोन करण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र तिने काहीच प्रतिसाद दिला नाही.
सोनी बेपत्ता झाल्यावर सिन्हा कुटुंबीयांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. डोंबिवली व मुंबईत महिलेचे काही नातेवाईक आहेत तिथेही त्यांनी जाऊन चौकशी केली. मात्र ती कुठेच सापडली नाही. अखेर त्यांनी पोलिसांत तक्रार केली. रामनगर पोलिस महिलेचा शोध घेत आहेत. 12 दिवस झाले तरी अद्यापही महिलेचा काहीच शोध लागला नाहीये.