डोंबिवली : एकदा माणूस रोजगारासाठी मुंबईत आला की त्याचं आयुष्य लोकल प्रवासात जातं असं म्हणतात. मात्र काहींचा तर जन्मच रेल्वे स्टेशन आणि लोकलमध्ये होण्याच्या घटनाही आता घडू लागल्या आहेत. अशीच एक घटना डोंबिवली स्टेशनवर आज घडलीय. ऐन गर्दीच्या वेळी एका महिलेनं डोंबिवलीच्या प्लॅटफॉर्म नंबर तीनवर एखा गोंडस बाळाला जन्म दिला. ही महिला लोकलनेच खडवलीहून कामा हॉस्पिटलला जात होती. मात्र प्रसुती वेदना वाढल्यामुळे या महिलेला डोंबिवली स़्टेशनवर उतरवण्यात आलं. या महिलेसह मुलाची प्रकृती सुखरूप आहे.
दरम्यान, बुधवारी मध्य रेल्वेच्या लोकल रविवारच्या वेळापत्रकानुसार चालण्यात येण्याचा निर्णय अखेर रेल्वेनं मागे घेतलाय. त्यामुळे आता नेहमीच्याच वेळापत्रकानुसार गाड्या धावत आहेत. मात्र, सकाळपासून लोकलचं वेळापत्रक रविवारनुसारच चालत होतं. त्यामुळे अनेक गाड्या रद्द होत्या. डोंबिवली, कल्याण, ठाणे, मुलुंड या सगळ्याच स्थानकांवर प्रवाशांची नुसती गर्दीच दिसत होती. मुंगी शिरायलाही जागा नव्हती असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ऐन बुधवारी कामाच्या दिवशी रेल्वेने हा निर्णय का घेतला? पाऊस नसतानाही रविवारच्या वेळापत्रकासाठी अट्टाहास का? असे अनेक प्रश्न माध्यमांनीही उपस्थित केले. रेल्वे स्थानकांवरची तुफान गर्दी, प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. या सगळ्यानंतर अखेर रेल्वेने रविवारचं हे वेळापत्रक रद्द करण्याचा निर्णय घेतला.