यवतमाळ निवडणुकीत महाविकास आघाडी विजयी

यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचा विजय

Updated: Feb 4, 2020, 12:34 PM IST

श्रीकांत राऊत, झी मीडिया, यवतमाळ : यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचा विजय झाला असून शिवसेनेचे दुष्यंत चतुर्वेदी यांनी तब्बल ११३ मतांनी भाजप उमेदवार सुमित बाजोरिया यांना मात दिली आहे. या निवडणुकीत सर्व ४८९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावून १०० टक्के मतदानाची नोंद केली होती. यात चतुर्वेदी यांना २९८ मतं मिळाली तर भाजप उमेदवार सुमित बाजोरिया यांना केवळ १८५ मतांवर समाधान मानावे लागले. ६ मतं अवैध ठरली. 

निवडणूक रिंगणात ६ उमेदवार होते. यापैकी चार अपक्षांनी आधीच वाटाघाटी करून माघार घेतल्याने चतुर्वेदी आणि बाजोरिया यांच्यात थेट लढत झाली. दुष्यंत चतुर्वेदी यांच्या विजयाची माहिती समजताच त्यांचे समर्थक आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. 

जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली होती. त्यांनी शिवसेनेची जागा कायम ठेवण्यात यश मिळविले. विजयी उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी यांचे पालकमंत्री संजय राठोड, माजी मंत्री शिवाजी मोघे, माजी मंत्री वसंत पुरके व काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस च्या आमदारांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. 

भाजपाचे स्थानिक नेते माजी मंत्री मदन येरावार यांनी या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी आमदाराचे बंधू सुमित बाजोरिया यांना निवडणूक रिंगणात उतरवून आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. 

भाजपने प्रचंड पैसा खर्च करूनही मतदारांनी त्यांना पराभवाची धूळ चारली असा आरोप यावेळी संजय राठोड यांनी केला. 

दुसरीकडे महाविकास आघाडीला अपेक्षित मतांपैकी २५ ते ३० मतं कमी मिळाल्याने कोणती मतं फुटली याचा शोध घेणे देखील सुरु झाले आहे.