सोलापूर : युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची जनआशीर्वाद यात्रा बुधवारी सोलापुरात पोहोचली. यानिमित्त आदित्य यांनी सोलापुरातल्या वालचंद कला महाविद्यालयात विद्यार्थ्यांशी संवाद साधला. जनआशीर्वाद यात्रेबाबत विद्यार्थ्यांशी चर्चा केली. मात्र यावेळी एका विद्यार्थ्याच्या प्रश्नाला उत्तर देताना आदित्य गोंधळून गेले.
खेकड्यांमुळे धरणे फुटतात का, असा सवाल विद्यार्थ्याने केला. या प्रश्नाला उत्तर देताना आदित्य ठाकरेंना चांगलीच कसरत करावी लागली. अखेर महाराष्ट्रातली धरणे कशी मजबूत राहतील, याची काळजी घेण्याचे आश्वासन देऊन त्यांनी वेळ मारून नेली.
विद्यार्थ्याने आदित्य ठाकरे यांना विचारले, काहीजण म्हणतात खेकड्यांमुळे धरण फुटू शकते तर काहीजण नाही म्हणतात मला तुमच्याकडून सत्य जाणून घ्यायचं आहे. यावर आदित्य ठाकरे यांनी विद्यार्थ्याला तुम्ही कोणता विषय शिकत आहात, असे विचारले. यावर विद्यार्थ्याने कॉमर्स असं उत्तर दिले.