झी 24 तासचा दणका : ऊसतोड महिलांच्या गर्भपिशव्या काढल्याऱ्या रॅकेटची होणार चौकशी - आरोग्य मंत्री

ऊसतोड महिलांच्या गर्भपिशवी प्रकरणावर चौकशीचे आदेश

Updated: Aug 10, 2021, 12:49 PM IST
झी 24 तासचा दणका : ऊसतोड महिलांच्या गर्भपिशव्या काढल्याऱ्या रॅकेटची होणार चौकशी - आरोग्य मंत्री title=

विष्णू बुरगे, झी २४ तास, बीड : मराठवाड्यात कोरोना काळात शेकडो ऊसतोड महिलांच्या गर्भपिशव्या काढल्याचं रॅकेट झी 24 तासनं उघड केल्यानंतर अनेक धक्कादायक बाबी समोर येतायत. झी २४ तासनं पर्दाफाश केलेल्या गर्भपिशव्या काढल्याच्या रॅकेटमधील हे धगधगतं वास्तव समोर आलं आहे. गर्भपिशवीला सूज आलीय असं सांगून डॉक्टरांनी या महिलेला गर्भपिशवी काढण्याचा सल्ला दिला. इतकच नाही तर कॅन्सरची भीतीही दाखवण्यात आली. अखेर या महिलेनं तब्बल 20 हजार रूपये खर्च करून गर्भपिशवी काढून टाकली. 

पण त्यांच्या वेदना कमी झाल्याच नाहीत. उलट त्रास आणखीच वाढलाय. शिवाय शरीराचा एक अविभाज्य भाग गमावल्याचं दु:ख उराशी आहे ते वेगळंच...बीड जिल्ह्यात गर्भपिशवी काढलेल्या शेकडो महिलांच्या बाबतीत हाच प्रकार घडला.  यावर आरोग्य मंत्री राजेश  टोपे यांनी गर्भ पिशव्या काढणा-या रॅकेटची होणार चौकशी होणार असून दोषींवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. 

बीड जिल्ह्यातील आणखी एका पीडितेचीही हीच व्यथा आहे. गेल्या 25 वर्षांपासून त्या ऊसतोडीचं काम करतायेत. अहोरात्र काम करताना शाररीक व्याधींकडे दुर्लक्ष झालं. मग डॉक्टरांनी त्यांना कॅन्सरचा बागुलबुवा दाखवून गर्भपिशवी काढण्याचा सल्ला दिला. त्यातून डॉक्टरांनी खिसे तर भरले पण ही महिला मात्र कायमची अधू झाली. ऑपरेशनमुळे काम होत नाही. पण तरीही जगण्यासाठी त्यांना हातात कोयता घेण्याशिवाय पर्याय नाही.

ऊसतोड महिलांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांच्या गर्भावरच अनेक नराधम डॉक्टरांनी डल्ला मारलाय. मात्र ढिम्म असलेलं प्रशासन अशा नरधमांना कठोर शिक्षा देण्यासाठी हालचाल करणार आहे की नाही हा खरा सवाल आहे. अन्यथा आणखी हजारो महिलांच्या जीवाशी सुरू असलेला हा खेळ असाच सुरू राहणार.

सरकारी सर्वेक्षणानंतरही गर्भपिशवी काढण्याचं प्रमाण का घटलं नाही ? सरकारी यंत्रणांचा नाकर्तेपणाच याला कारणीभूत ठरतोय का ? गर्भपिशवी काढण्यास प्रवृत्त करणा-या खासगी डॉक्टरांविरोधात कारवाई का झाली नाही ? त्यामुळे या प्रकरणात सखोल चौकशी करून पीडित महिलांना न्याय देण्याची मागणी जोर धरू लागलीय.