अभ्यासावरुन रागवणाऱ्या आईची अल्पवयीन मुलीकडून हत्या, नंतर मामाला पाठवला मेसेज; आत्महत्या केल्याचा रचला बनाव

 धक्कादायक घटना. अभ्यासावरुन रागावणाऱ्या स्वत:च्या आईची 15 वर्षीय मुलीने गळा दाबून हत्या केल्याचे पुढे आले आहे. (Mother Murder in Navi Mumbai)  

Updated: Aug 10, 2021, 12:02 PM IST
अभ्यासावरुन रागवणाऱ्या आईची अल्पवयीन मुलीकडून हत्या, नंतर मामाला पाठवला मेसेज; आत्महत्या केल्याचा रचला बनाव title=
प्रातिनिधिक फोटो

नवी मुंबई : धक्कादायक घटना. अभ्यासावरुन रागावणाऱ्या स्वत:च्या आईची 15 वर्षीय मुलीने गळा दाबून हत्या केल्याचे पुढे आले आहे. (Mother Murder in Navi Mumbai) हत्येनंतर आईने आत्महत्या केल्याचा बनाव रचण्यासाठी या अल्पवयीन मुलीने मामाला आईच्या मोबाईलवरुन मेसेच पाठवला. नवी मुंबईतील ऐरोली सेक्टर-7 मध्ये राहणाऱ्या एका 15 वर्षीय मुलीने अभ्यास करण्यासाठी सतत तगादा लावणाऱ्या आपल्या आईचा कराटेच्या कापडी पट्टयाने गळा आवळून तिची हत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकिस आली आहे.

दरम्यान, आपल्या आईची हत्या केल्यानंतर आईने आत्महत्या केल्याचे भासविण्यासाठी या अल्वपयीन मुलीने बेडरुमचा दरवाजा आतुन बंद केला आणि आईच्या मोबाईल फोनवरुन आपल्या नातेवाईकांना (मामा) आत्महत्या करत असल्याचा मेसेज पाठविल्याचे देखील तपासात आढळून आले आहे. 30 जुलै रोजी ही घटना घडली होती. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. 

या घटनेतील मृत महिलेचे नाव शिल्पा (41) असे असून ती ऐरोली सेक्टर-7 मधील राकेश सोसायटीत पती संतोष (44) आणि 15 वर्षीय मुलगी, 6 वर्षांचा मुलगा यांच्यासह राहात होती. आपल्या मुलीने डॉक्टर व्हावे अशी आई-वडील या दोघांची इच्छा होती. त्यामुळे त्यांनी आपल्या मुलीला मे महिन्यापासून नीट परीक्षेच्या तयारीसाठी क्लास लावून दिला होता. या परीक्षेच्या अभ्यासामध्ये मुलीने सातत्य ठेवावे यासाठी आई ही कायम आपल्या मुलीवर लक्ष ठेवून होती. त्यामुळे मुलीचे आपल्या आईसोबत अभ्यासावरुन नेहमी भांडण होत होते. 27 जुलै रोजी मुलीने मोबाईल घेतल्याने वडिलांकडून तिला ओरडा मिळाला होता. त्यामुळे ती रागावून जवळच राहणाऱ्या मामाच्या घरी गेली होती. 

त्यानंतर सायंकाळी आई आपल्या मुलीची समजूत काढण्यासाठी भावाच्या घरी गेली असताना, मुलीचे आपल्या आईसोबत पुन्हा वाद झाला. या वादात मुलीने आई वडिलांविरोधात पोलिसात तक्रार करण्याची धमकी देखील दिली. त्यामुळे आईने मुलीला रबाळे पोलीस ठाण्यात नेले होते. त्यावेळी रबाळे पोलिसांनी मुलीची आणि तिच्या आई-वडिलांची समजूत काढून त्यांना घरी पाठवुन दिले होते. त्यानंतर गत 30 जुलै रोजी सकाळी या मुलीचे वडील कामानिमित्त बाहेर गेल्यानंतर घरामध्ये ती आई आणि लहान भावासह होती. दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास आईने पुन्हा आपल्या मुलीला अभ्यासावरुन रागावून तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. 

मुलीला मारहाण करताना आईने हातात सुरी घेतल्याने मुलीला आपल्या आईचा राग आला. त्यामुळे तिने आईचा जोरदार प्रतिकार केला. यावेळी आई आणि मुलगी या दोघींमध्ये झालेल्या झटापटीत आईने मुलीच्या डाव्या हाताच्या तळव्याला चावा घेतल्याने मुलीने आईला ढकलून दिले. त्यामुळे आई खाली पडून तिच्या डोक्याला बेडरुममध्ये असलेल्या कॉटचा कोपरा लागला. त्यामुळे आई अर्धमेली होऊन पडल्यानंतर देखील तिने बेडवर पडलेला कराटेचा कापडी बेल्ट हातात घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मुलीनेच तो बेल्ट आपल्या हातात घेऊन आईच्या गळ्याभोवती घट्ट आवळून धरत तिची हालचाल बंद होईपर्यत तसाच धरुन ठेवला. आई मेल्याची खात्री झाल्यानंतर तिने आईला सोडले, अशी माहिती पोलिसांनी दिली.

आईची हत्या केल्यानंतर हा प्रकार हा आत्महत्येचा वाटावा यासाठी मुलीने प्रथम बेडरुमच्या दरवाजाला बाहेरुन असलेली चावी काढून ती आईच्या बेडरुममध्ये ठेवली. त्यानंतर तिने आईचा मोबाईल घेऊन तिच्या व्हॉट्स्अॅवरुन वडील, मामा, मावशी यांच्या मोबाईलवर मी सर्व प्रयत्न केले, मी आपले आयुष्य संपवित आहे. अशा प्रकारचा इंग्रजीत मेसेज पाठवून बेडरुमचा दरवाजा लावुन घेतला. त्यानंतर या मुलीने आपल्या वडिलांना फोन करुन आई बेडरूमचा दरवाजा उघडत नसल्याचे सांगितले. त्यामुळे या मुलीच्या वडिलांनी जवळच राहणारा आपला मेव्हण्याला सांगितल्यानंतर त्याने तत्काळ बहिणीच्या घरी धाव घेऊन बेडरुमचा दरवाजा तोडल्यानंतर बेडरुममध्ये त्याला बहीण  मृतावस्थेत पडल्याचे आणि तिच्या गळ्याभोवती कराटेचा कापडी पट्टा आवळल्याचे निदर्शनास आले, असे पोलिसांनी माहिती देताना सांगितले. 

या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर रबाळे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तिच्या आईचा मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर शवविच्छेदनात त्यांचा मृत्यू डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे आणि गळा आवळल्यामुळे झाल्याचे आढळुन आले. त्यानंतर  पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी त्यांच्या कुटुंबियांची चौकशी सुरु केली. या चौकशीत पोलिसांनी मुलीला विश्वासत घेऊन तिच्याकडे याबाबत विचारपूस केली असता, तिनेच आईची हत्या केल्याची कबुली दिली. त्यानंतर रबाळे पोलिसांनी स्वत: या प्रकरणात फिर्यादी होऊन मुलीवर हत्या आणि पुराव नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. या प्रकरणात मुगली अल्पवयीन असल्याने पोलिसांनी मुलीला अजून अटक केली नाही. मात्र, तिला अटक होण्याची शक्यता आहे.