close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

धनंजयने निवडणूक इतक्या खालच्या स्तराला नेऊ नये- पंकजा मुंडे

राजकारण गलिच्छ झालेय, मात्र निसर्ग सगळ्याचा न्याय करेल.

Updated: Oct 20, 2019, 09:02 PM IST
धनंजयने निवडणूक इतक्या खालच्या स्तराला नेऊ नये- पंकजा मुंडे

परळी: गेल्या काही तासांपासून परळीत सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी आपले चुलत बंधू आणि राजकीय प्रतिस्पर्धी धनंजय मुंडे यांना निवडणूक इतक्या खालच्या स्तराला नेऊ नये, असा सल्ला दिला. पंकजा मुंडे यांनी काहीवेळापूर्वीच गोपीनाथ गडावर जाऊन गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेतले. यानंतर त्यांनी 'झी २४ तास'शी संवाद साधला. यावेळी त्यांना धनंजय मुंडे यांनी केलेल्या टीकेविषयी विचारणा करण्यात आली. तेव्हा पंकजा यांनी म्हटले की, मला यासंदर्भात अधिक काही बोलायचे नाही. मात्र, निसर्ग या सगळ्याचा न्याय करेल. 

निवडणूक इतक्या खालच्या स्तराला नेऊ नये, हा सल्ला मी धनंजयला देऊ इच्छिते. त्याच्यामुळेच आमच्या नात्यामध्ये तणाव निर्माण झाल्याचे पंकजांनी सांगितले.

धनंजय मुंडेंच्या तक्रारीनंतर भाजपच्या सोशल मीडिया टीमवर गुन्हा दाखल

धनंजय मुंडे यांनी पंकजा यांच्यावर आक्षेपार्ह शब्दांत टीका केल्याची क्लीप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. यानंतर या भावाबहिणीमध्ये नव्या वादाला सुरुवात झाली आहे. हे प्रकरण गुन्हा दाखल होण्यापर्यंत पोहोचले आहे. तसेच राज्य महिला आयोगानेही याप्रकरणी सुमोटो याचिका दाखल केली होती. मतदानाला अवघे काही तास शिल्लक असल्यामुळे यामुळे परळीतील राजकारणाला रंगत आली आहे. 

'धनंजय मुंडे संपला पाहिजे यासाठीच हे चाललंय'

तर दुसरीकडे धनजंय मुंडे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. संबंधित क्लीपमध्ये फेरफार करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. मात्र, धनंजय यांनी आता खोटे बोलू नये, असे पंकजा यांनी म्हटले. या सगळ्या प्रकाराची वाच्यता झाल्यानंतर धनंजय मुंडे यांनी ती क्लीप स्वत:च्या फेसबुक पेजवरून डिलीट केली होती. मात्र, निवडणूक आयोगाकडे त्याचे पुरावे आहेत. दुसऱ्या भावाने आमच्या नात्यात विष कालवले, या धनंजय मुंडेंच्या दाव्याचेही पंकजांनी यावेळी खंडन केले. चूक झाल्यानंतर ती इतरांवर ढकलणे बरोबर नाही. किमान स्वत:च्या कृतीची जबाबदारी घ्या, असे पंकजा मुंडे यांनी सांगितले.