अमिताभ बच्चन यांच्याकडे काम करणारे २८ जण क्वारंटाईन

अमिताभ बच्चन यांचं निवासस्थान कोविड प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलं आहे. 

Updated: Jul 12, 2020, 09:34 PM IST
अमिताभ बच्चन यांच्याकडे काम करणारे २८ जण क्वारंटाईन

मुंबई : बॉलिवूड ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं. बिग बी यांच्या पाठोपाठ अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या बच्चन या सर्वांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले. त्यानंतर आता बच्चन कुटुंबात काम करणाऱ्या २८ जणांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या बच्चन यांच्या थेट संपर्कात हे कर्मचारी आले होते. 

एकूण ५४ कर्मचाऱ्यांपैकी २८ कर्मचारी हाय रिस्क कॉन्टॅक्टमधील असल्याने त्यांना जलसा आणि जनक बंगल्यावर क्वारंटाईन केलं आहे. या सर्वांची कोरोना टेस्ट केली जाणार आहे. यांचे रिपोर्ट सोमवारी संध्याकाळपर्यंत येतील. ऊर्वरीत २६ कर्मचारी हे लो रिस्क कॉन्टॅक्टमधील असल्याने त्यांना होम क्वारंटाईन सांगण्यात आलं आहे.

अमिताभ बच्चन यांचं निवासस्थान कोविड प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलं आहे. बिग बी राहात असलेल्या भागातील त्यांचे चारही बंगले रविवारी महानगरपालिकेने प्रतिबंधित क्षेत्र (containment zone) म्हणून घोषित केलं आहेत. बच्चन कुटुंबीयांचे जलसा, प्रतीक्षा, जनक आणि वत्सा हे चार बंगले प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले असून ते सील करण्यात आले आहेत. या निवासस्थानी पालिकेकडून निर्जंतुकीकरण करुन बंगल्यातील सर्व कर्मचाऱ्यांची तपासणी (स्क्रीनिंग) तसंच अन्य तपासण्या पूर्ण केल्या गेल्या आहेत. 

राज्यात ७८२७ कोरोना रुग्ण वाढले; तर १७३ जणांचा मृत्यू