६२ वा महापरिनिर्वाण दिन : रेल्वेची विशेष व्यवस्था

 स्थानकांवर मदत कक्षाची स्थापना

Updated: Dec 6, 2018, 08:10 AM IST
६२ वा  महापरिनिर्वाण दिन : रेल्वेची विशेष व्यवस्था title=

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर चैत्यभूमीवर येणाऱ्या लाखो अनुयायांसाठी पश्चिम रेल्वे प्रशासनाने लोकल गाडयांना होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता विशेष व्यवस्था केलेली आहे. अनुयायांच्या सोयीसाठी खास तिकिट खिडक्या, गर्दी नियंत्रित करण्यासाठी आरपीएफ-जीआरपीच्या जवानांची नियुक्ती केलेली आहे. दादर येथील चैत्यभूमीवर मोठ्या संख्येने अनुयायी येतात. या अनुयायांना चैत्यभूमी आणि पॅगोडाला जाण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी चर्चगेट,दादर,अंधेरी,माहिम आणि बोरीवली स्थानकांवर मदत कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे.

जादा तिकिट खिडक्या

७ डिसेंबरपर्यत २४ तास मराठी आणि हिंदी भाषेत माहिती देण्यासाठी रेल्वेचे कर्मचारी तैनात असणार आहेत. तसेच या रेल्वे स्थानकांवर स्थळांची माहिती देणारे साईन बोर्ड देखील लावलेले आहेत. पादचारी पुलांवर होणारी गर्दी नियंत्रित ठेवण्यासाठी आरपीएफ आणि जीआरपीचे जवान तैनात केलेले आहेत.

तसेच रेल्वे स्थानकांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे नजर ठेवली जाणार आहे. अनुयायांच्या सोयीसाठी तिकिट बुकींग करण्यासाठी आणि रिफंड देण्यासाठी ७ डिसेंबरपर्यत जादा तिकिट खिडक्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

तातडीची वैद्यकीय मदत

 दादर,माहिम आणि बोरीवली स्थानकात एटीव्हीएम मदतनीस उपलब्ध केलेले आहेत. याशिवाय नंदुरबार,जळगाव आणि अहमदाबादला जाणाऱ्या मेल-एक्सप्रेस गाड्यांचे मॉनिटरिंग केले जाणार आहे.

खासकरुन उपनगरीय मार्गावरील दादर आणि माहिम या स्थानकात अनुयायी ट्रेनमध्ये चढल्याची-उतरल्याची खात्री करुनच गाडी पुढे नेण्याचे आदेंश गार्डला देण्यात आलेले आहे. रेल्वे स्थानकांमध्ये शौचालयांची सोय करण्यात आलेली आहे.तातडीची वैद्यकीय मदत देखील पुरविण्यात येणार आहे.