पुण्यातला तरुण मुंबईत सासऱ्यांना भेटला, नंतर अटल सेतूवरुन संपवलं आयुष्य

Atal Setu Suicide News: अटल सेतूवरून 35 वर्षीय  तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. तिसरी  आत्महत्या असल्याने सुरक्षेच्या प्रश्न ऐरणीवर येत आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Sep 5, 2024, 02:29 PM IST
पुण्यातला तरुण मुंबईत सासऱ्यांना भेटला, नंतर अटल सेतूवरुन संपवलं आयुष्य title=
35 Year Old Pune Banker Dies After Jumping From Atal Setu

Atal Setu Suicide News: अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूवर आत्महत्या करण्याच्या प्रकरणात वाढ होताना दिसत आहे. पुण्यातील एका 35 वर्षीय तरुणाने अटल सेतूवरुन उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. अ‍ॅलेक्स रेगी असं या तरुणाचे नाव असून तो व्यवसायाने बँकर आहे. अ‍ॅलेक्स हा पिंपरी येथील रहिवासी होता. एका कामासाठी तो मुंबईत आला होता. मात्र, येथे येऊन त्याने अटल सेतूवरुन उडी घेत आत्महत्या केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

अ‍ॅलेक्स कामानिमित्त पुण्याला आला होता. त्याचवेळी तो चेंबूर येथे सासऱ्यांना भेटण्यासाठी गेला होता. त्यांना भेटून पुण्याला परत जात असताना अटल सेतूवर आला. तिथे त्याने गाडी थांबवली व पुलावरुन समुद्रात उडी घेतली. अ‍ॅलेक्सने कोणतीही सुसाईड नोट सोडली नव्हती. त्यामुळं त्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले हे अद्याप कळू शकलेले नाहीये. या प्रकरणी पोलिस तपास करत आहेत. अ‍ॅलेक्सच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याच्यावर कामाचा प्रचंड दबाव होता. त्यामुळं तो नेहमी नैराश्यात असायचा, असं त्यांनी म्हटलं आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटल सेतूवर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यावरुन मॉनिटरिंग कॅमेऱ्यावरुन मॉनिटरिंग टीमने कार थांबलेली पाहिली. त्यानंतर त्यांनी लगेचच पोलिसांना इशारा दिला. मात्र, पोलीस तिथे पोहोचण्याआधीच अॅलेक्सने समुद्रात उडी घेतली. त्यानंतर पोलिसांनी व बचाव पथकाने अॅलेक्सला वाचवण्यासाठी प्रयत्न केला. मात्र त्याचा मृत्यू झाला होता. बचाव पथकाने त्याचा मृतदेह बाहेर काढला असून त्याच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला आहे. 

दरम्यान, अटल सेतूवरुन आत्महत्या करण्याची घटना तिसऱ्यांदा घडली आहे. यापूर्वी एका डॉक्टर महिलेने अटल सेतूवरुन आत्महत्या केली होती. तर, दुसऱ्या घटनेत परदेशातून आलेल्या व्यक्तीने व सध्या डोंबिवलीत स्थायिक असलेल्या तरुणाने आत्महत्या केली होती. त्यामुळं अटल सेतूवरुन आत्महत्येचे प्रकार घडल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.