Salman Khan Home Firing CCTV Footage: अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्स इमारतीतील निवासस्थानाबाहेर पहाटेच्या सुमारास झालेल्या गोळीबाराची दखल थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सलमान खानबरोबर फोनवरुन चर्चा केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुंबईच्या पोलीस आयुक्तांबरोबरही यासंदर्भात चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, या हल्लाचे सीटीटीव्ही फुटेज समोर आलं असून यामध्ये गोळीबार केल्यानंतर दुचाकीवरुन भरधाव वेगात निघून गेलेले हल्लेखोर दिसत आहेत.
सलमान खानच्या गॅलेक्स येथील निवासस्थानाबाहेर आज (14 एप्रिल 2024) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला. मोटरसायकलवरुन आलेल्या दोघांनी सलमानच्या घराच्या दिशेने 5 गोळ्या झाडल्या. यापैकी 2 गोळ्या इमारतीच्या भिंतीला लागल्या. एका गोळीचं कवच तर सलमानच्या घरात सापडलं. झाडण्यात आलेल्या 5 गोळ्यांपैकी एक गोळी घराच्या खिडकीला लागली. बाल्कनीमधील जाळीला एक गोळी लागल्याची माहिती समोर येत आहे. या हल्ल्यानंतर सलमानच्या घराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. दरम्यान राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबारासंदर्भातील तपास सुरु असल्याचं सांगितलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सलमानशी चर्चा केली आहे. सलमानबरोबर झालेल्या चर्चेत नेमकं काय बोलणं झालं याची माहिती समोर आलेली नाही. मात्र शिंदेंनी सलमानला सुरक्षेसंदर्भात चिंता न करण्याचा सल्ला देत आवश्यक ती सर्व सुरक्षा पुरवली जाईल असं सांगितल्याची माहिती काही हिंदी वृत्तवाहिन्यांनी दिली आहे. सलमानशी फोनवर बोलणं झाल्यानंतर शिंदेंनी मुंबईच्या पोलीस आयुक्तांशी चर्चा करुन प्रकरणाच्या सखोल तपासाचे आदेश दिले आहेत. दरम्यान सलमानच्या घराहाहेर सध्या फॉरेन्सिक टीम पोहचली असून सर्व पुरावे गोळा केले जात आहेत. दुसरीकडे या हल्ल्यासंदर्भातील एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. या फुटेजमध्ये सलमानच्या घराखालून भरधाव वेगात मोटरसायकवरुन हल्लोखर जाताना दिसत आहेत.
काही काळापूर्वीच लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीतील संपत नेहराने सलमानच्या घराची रेकी केल्याची माहिती समोर आली होती. संपतला हरियाणा पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याने हा खुलासा केला होता. यापूर्वीही सलमानला अगदी त्याच्या घराजवळ धमकीचं पत्रही येऊन गेलं आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगने सलमानला यापूर्वी जिवे मारण्याची धमकी दिलेली आहे. त्यानंतर सलमानने शस्त्र परवान्यासाठी मुंबईच्या पोलीस आयुक्तांची भेटही घेतली होती. मागील अनेक महिन्यांपासून सलमानला सातत्याने धमकावलं जात आहे. आता तर थेट त्याच्या घरावर गोळीबार करण्यात आला आहे. या हल्ल्याशी बिश्नोई गँगचा काही संबंध आहे का या दिशेने पोलीस तपास करत आहेत.