राष्ट्रवादीचे ५ आमदार अजूनही संपर्क कक्षेच्या बाहेर

आमदारांसोबत संपर्क साधण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न...

Updated: Nov 24, 2019, 09:21 AM IST
राष्ट्रवादीचे ५ आमदार अजूनही संपर्क कक्षेच्या बाहेर title=

मुंबई : अजित पवारांसोबत राजभवनवर गेलेले राष्ट्रवादीचे १३ पैकी ८ आमदार आतापर्यंत स्वगृही परतले आहेत. धनंजय मुंडेंसह, दिलीप बनकर, प्रकाश सोळंके यांच्याखेरीज इतरही ५ राष्ट्रवादीत परतले आहेत. त्यामुळे अजित पवारांचं बंड आता क्षीण होत असल्याचं चित्र दिसून येत आहे. दरम्यान अजित पवारांच्या मनधरणीचे राष्ट्रवादीचे प्रयत्न फोल ठरले आहेत. सुनिल तटकरे, दिलीप वळसे पाटील यांनी अजित पवारांची भेट घेऊन त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला यश आलं नाही. मात्र आपण निर्णय मागे घेणार नाही, अशी भूमिका अजित पवारांनी घेतील आहे. तर अजित पवारांना आपण फोन केला नसून, फोन केल्याची चर्चा निराधार असल्याचं सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलंय. 

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवारांनी भाजपशी हातमिळवणी करत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शनिवारी सकाळी घडलेलं हे राजकीय महानाट्य संपूर्ण महाराष्ट्रासाठी अनपेक्षित, धक्कादायक होतं. राजभवनावर अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, तेव्हा राष्ट्रवादीचे काही आमदार तिथं उपस्थित होते. त्यापैकी काही आमदार पुन्हा शरद पवारांकडे परतले. पण ५ आमदार अजूनही राष्ट्रवादीच्या संपर्कात नाही आहेत.

राष्ट्रवादीच्या सह्यांची यादी पक्षाकडे होती. हीच यादी अजित पवारांनी राज्यपालांकडे दिली असावी. त्यामुळे राज्यपालांचीही फसवणूक झाली असावी, असं विधान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी केलं. सकाळी अचानक झालेल्या शपथविधीनंतर वाय बी चव्हाण सेंटरवर पवार आणि उद्धव ठाकरे यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे पक्ष एकत्र असून कोणत्याही संकटाचा सामना एकत्रितपणे करू असंही पवार म्हणाले. फडणवीस बहुमत सिद्ध करू शकणार नाहीत, त्यानंतर आपलं सरकार येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.