कर्जाची परतफेड न केल्यामुळे गमवावा लागला जीव

एअर इंडियाच्या माजी इंजिनिअरची हत्या 

Updated: Dec 13, 2019, 09:31 AM IST
कर्जाची परतफेड न केल्यामुळे गमवावा लागला जीव  title=

मुंबई : 2 महिन्यांपूर्वी हरवलेल्या एअर इंडियाचे माजी अभियंता दीपक पांचाळ यांचा मृतदेह गुजरातमध्ये सापडला आहे. या प्रकरणी 3 जणांना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. गुजरातच्या हलवद पोलिसांना ब्राम्हणी धरणात सापडलेला मृतदेह हा दीपक पांचाळ यांचा असल्याचा छडा एका कार पार्किंग पावतीवरून लागला. दीपक पांचाळ यांनी मित्राला पैशांची केलेली मदत महागात पडली असून यामध्ये त्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. 

दीपक पांचाळ 29 सप्टेंबरला अचानक अंधेरीतील घरातून गायब झाले त्यानंतर या संदर्भात अंधेरी पोलीस ठाण्यांमध्ये ते हरवले असल्याची तक्रार दाखल केल्यानंतर सदरचा गुन्हा गुन्हे शाखेच्या युनिट 10 कडे देण्यात आला होता. तब्बल 2 महिने  पोलिस यासंदर्भात तपास करीत होते मात्र काही केल्या दीपक पांचाळ यांचा शोध लागत नव्हता. 

तपासादरम्यान गुजरात राज्यातील हलवद येथील ब्राह्मणी डॅम नंबर 2 येथे एका गोधडीत सिमेंटच्या खांबाला बांधलेल्या अवस्थेत एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याचं हलवत पोलिसांना आढळून आले. या मृतदेहाच्या कपड्यांमध्ये सापडलेल्या कार पार्किंग पावतीवरून याचा खुलासा झाला की, हा मृतदेह दीपक पांचाळ यांचा आहे. पांचाळ यांनी मुंबई विमानतळावर आपली कार पार्क केली होती त्याची ही पावती. या पावतीवर एका विमान प्रवासाचा पीएनआर क्रमांक होता. हा क्रमांक नवी दिल्लीतील रिया टूर्स अँड ट्रॅव्हल्समधील असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. 

त्यानंतर दीपक पांचाळ या व्यक्तीने अंधेरीतून तिकीट काढल्याची माहिती पोलिसांना मिळाली. याची शहानिशा करण्यासाठी हलवद पोलिसांना मुंबई पोलिसांशी संपर्क साधला. तेव्हा अंधेरी येथे या प्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर आली. मयत  दिपक पांचाळ यांनी आरोपींकडून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी मोठ्या प्रमाणात लाखो रुपयांचे कर्ज घेतले होते. गेल्या काही महिन्यांपासून घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी टाळाटाळ करत होते .

त्यामुळे जयंतीभाई बाईलालभाई पटेल (64) गोपाळ उर्फ करण लिलाभाई परमार, (27 ) राजुभाई रामभाई आगठ (35)  या तीन आरोपींनी मयत दिपक पांचाळ यांचे अपहरण करून त्यांना अहमदाबाद येथे एका घरात डांबून सतत मारहाण करीत होते. या मारहाणीत दिपक पांचाळ यांचा मृत्यू झाल्याने त्यांचा मृतदेह आरोपीनी ब्राह्मणी डॅम मध्ये फेकून दिला होता. या संदर्भात पोलीस अधिक तपास करीत आहे.