मुंबई : तुम्ही कोणतीही मॅट्रोमोनीयल साईट वापरत असाल तर सावध राहा. कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेऊ नका. असे आम्ही का सांगत आहोत, कारण या साईट्सला सध्या काही भामट्यांनी, लोकांना फसवण्याचे साधन बनवले आहे. या साईटवर लोकं शक्यतो एकमेकांना ओळखत नसतात. ते कुठे रहातात किंवा त्यांचा स्वभाव याबद्दल शक्यतो माहिती मिळत नाही. त्यामुळे या गोष्टींचा फायदा असे भामटे घेतात. तुम्हाला विश्वास बसणार नाही, परंतु एका इंजिनिअरने चक्कं 12 हाय प्रोफाईल आणि सुशिक्षित महिलांना लुटले आणि त्यांचा विनयभंग केला असल्याची घटना मुंबईत घडली आहे.
या आरोपीविरोधात तक्रार दाखल झाल्यानंतर त्याला अटक झाली. परंतु तो इतका हुशार होता की, त्याने तो फसणार नाही याची संपूर्ण काळजी घेतली होती.
नवी मुंबई पोलिसांनी सोमवारी 32 वर्षीय महेश उर्फ करन गुप्ता याला मालाडवरुन अटक केली. पोलिस त्याला 4 महिन्यांपासून शोधत होते. पंरतु तो दरवेळी वेगवेगळे फोन वापरत असल्यामुळे पोलिसांच्या हाती लागत नव्हता.
पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, हा आरोपी मेट्रोमोनियल साईटवरुन वेगवेगल्या नावाने अकाउंट बनवायचा आणि आपल्या गोड गोड बोलण्याने हाय प्रोफाईल मुलींना त्याच्या जाळ्यात ओढायचा. त्यानंतर त्यांना कोणत्याही हॉटेल, मॉल किंवा पबमध्ये तो भेटायला बोलवायचा जिकडे तो त्यांच्या सोबत अश्लील चाळे करायचा.
पोलिस उप आयुक्त सुरेश मेंगडे यांच्या म्हणण्यानूसार, तो प्रत्येक महिलेसोबत बोलण्यासाठी वेगवेगळ्या मोबाईल नंबरचा वापर करायचा. एवढेच काय तर, तो ओला किंवा उबर बुक करण्यासाठी ही दुसऱ्या मोबाईल नंबरचा वापर करत असे. त्याने कधीही त्याची ओळख पटेल अशा कागद पत्र किंवा मोबाईल नंबरचा वापर केला नाही.
करन गुप्ता हा इंजिनिअर आहे. तसेच त्याने या आधी हॅकिंगचे काम केले असल्याने त्याला मोबाईल आणि साबरच्या जगाची संपूर्ण माहिती आहे. त्यामुळेच तो 4 महिने पोलिसांचा हाती लागला नाही. परंतु नंतर पोलिसांच्या युक्तीपुढे त्याची हुशारी काम आली नाही, ज्यामुळे तो फसला.
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने एका नामांकित संस्थेतून इंजिनिअरचे शिक्षण घेतले आहे आणि आतापर्यंत अनेक चांगल्या कंपन्यांमध्ये त्याने काम देखील केले आहे. पोलिसांना आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, या आरोपीने 12 महिलांशी लैंगिक संबंध आणि अत्याचार केले आहेत. परंतु ही संख्या जास्त असू शकते. आरोपीला न्यायालयात हजर केले आहे. कोर्टाने त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिसांचा पुढील तपास सुरु आहे.