केईएम रूग्णालयातील प्रिन्सचा मृत्यू

महापालिकेच्या हलगर्जीपणाचा बळी 

Updated: Nov 22, 2019, 08:53 AM IST
केईएम रूग्णालयातील प्रिन्सचा मृत्यू

मुंबई : मुंबई महापालिकेच्या हलगर्जीपणामुळे अवघ्या तीन महिन्यांच्या प्रिन्सचा मृत्यू झाला आहे. केईएम रूग्णालयातील हलगर्जीपणामुळे प्रिन्सला आपला हात गमवावा लागला होता. गुरूवारी त्याची तब्बेत आणखी खालवली होती. आज अखेर त्याचा मृत्यू झाला आहे. 

केईएम रुग्णालात आगीच्या दुर्घटनेत प्रिन्सला हात गमावावा लागला होता. प्रिन्स राजभरची गुरूवारी तब्बेत खालावली होती. त्याच्या हालचालीही बंद झाल्यामुळे त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. अखेर आज या चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. (केईएम रूग्णालयात प्रिन्सची मृत्यूशी झुंज) 

७ नोव्हेंबरला रुग्णालयात लागलेल्या आगीत प्रिन्सचा कान आणि एक हात होरपळला होता. त्यामुळे त्याचा कान आणि हात कापण्यात आला. शस्त्रक्रियेनंतर २ ते ३ दिवस प्रिन्सची प्रकृती स्थिर होती. त्यानंतर प्रिन्सला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. पण अखेर त्याची प्राणज्योत मालवली आहे. या प्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. 

प्रिन्सला वाराणसीहून उपचारांसाठी मुंबईत आणले होते. प्रिन्सला हृदयविकाराचा त्रास होता. याकरता त्याला  कृत्रिम श्वसन यंत्रणेवर ठेवले होते. हृदयाच्या ठोक्यांवर देखरेख करण्यासाठी ईसीजी यंत्रही त्याला लावले होते. या ईसीजी यंत्रामध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्याने मध्यरात्री अडीचच्या सुमारास तारांनी पेट घेतला. त्यामुळे प्रिन्सच्या खाटेवरील चादरीलाही आग लागली. यामध्ये त्याच्या खांद्याला, कानाला आणि कमरेच्या भागाला भाजले ह्या घटनेनंतर सोमवारी हाताची सर्जरी करण्यात आली परंतु त्या सर्जरी नंतर प्रिन्सचा एक हात निकामी झाला होता. त्यानंतर त्याचा आज सकाळी मृत्यू झाला.