केईएम रूग्णालयात प्रिन्सची मृत्यूशी झुंज

मुंबई महापालिकेच्या हलगर्जीपणामुळे अवघ्या तीन महिन्यांच्या बाळाला हात गमवावा लागला.

Updated: Nov 21, 2019, 10:18 PM IST
केईएम रूग्णालयात प्रिन्सची मृत्यूशी झुंज

बागेश्री कानडे, झी मीडिया, मुंबई : मुंबई महापालिकेच्या हलगर्जीपणामुळे अवघ्या तीन महिन्यांच्या बाळाला हात गमवावा लागला. केईएम रुग्णालयात लागलेल्या आगीत प्रिन्सला हात गमवावा लागला. दिवसेंदिवस प्रिन्स राजभरची प्रकृती खालावत चाललीय. केईम रुग्णालात आगीच्या दुर्घटनेत हाम गमावावा लागलेल्या प्रिन्स राजभरला आता व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलंय. प्रिन्सच्या हालचालीही बंद झालेल्या आहेत.

अजूनही प्रिन्सला झालेलं इन्फेक्शन नियंत्रणात आलेलं नाही. महत्वाचं म्हणजे ज्यादिवशी आग लागली होती त्यावेळी प्रिन्स ज्या नर्सच्या देखरेखीखाली होता ती नर्स अजूनही प्रिन्सला ठेवण्यात आलेल्या वॉर्डमध्ये येतेय. याचाच अर्थ या नर्सवरही अजूनही कारवाई करण्यात आलेली नाही. तर दुसरी नर्स आणि डॉक्टर त्याची देखरेख करत आहेत.

या घटनेचे तीव्र पडसाद उमटले, त्यानंतर प्रिन्सला दहा लाखांची मदत जाहीर करण्यात आली असली दिवसेंदिवस प्रिन्सची तब्बेत आणखीनच खालावत चाललीय. हृदयावर उपचार करण्यासाठी प्रिन्सला उत्तर प्रदेशातून मुंबईतल्या केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं,

मात्र, ७ नोव्हेंबरला रुग्णालयात लागलेल्या आगीत प्रिन्सचा कान आणि एक हात होरपळला. त्यामुळे त्याचा कान आणि हात कापण्यात आला. शस्त्रक्रियेनंतर २ ते ३ दिवस प्रिन्सची प्रकृती स्थिर होती, मात्र आता प्रिन्सला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलंय. भोईवाडा पोलीस ठाण्यात याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आलाय.