आदित्य ठाकरे ५ वर्ष मुख्यमंत्री राहतील - संजय राऊत

संजय राऊत यांच्या दाव्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण

Updated: Jun 12, 2019, 03:15 PM IST
आदित्य ठाकरे ५ वर्ष मुख्यमंत्री राहतील - संजय राऊत  title=

मुंबई : 'आदित्य ठाकरे पाच वर्षं मुख्यमंत्री राहतील, आदित्य ठाकरे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार,' असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्रीपदाबाबत चंद्रकांत पाटील किंवा सुधीर मुनगंटीवारांना बोलण्याचा अधिकार नाही, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे हे निवडणूक लढवतील या चर्चा आता खऱ्या ठरताना दिसत आहेत. याआधी निवडणूक लढवावी किंवा नाही याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते निर्णय घेतील अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिली होती. शिवसेना नेते आणि युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरेंनी विधानसभेची निवडणूक लढवावी यासाठी मुंबईतल्या सुरक्षित मतदारसंघाची चाचपणी सुरू असल्याचं देखील समोर आलं होतं. 

आदित्य ठाकरे वरळी, माहिम किंवा शिवडीमधून विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे. आदित्य ठाकरेंनी वरळी आणि माहिम विधानसभा मतदारसंघातील युवा सेनेच्या कार्यकर्त्यांची दादरच्या सेनाभवनात बैठक घेतली होती. तर दुसरीकडे आदित्य ठाकरेंसाठी वरळी विधानसभेची जागा सोडण्याची तयारी आमदार सुनिल शिंदे याआधीच दर्शवली आहे.

ठाकरे कुटुंबातून आतापर्यंत कोणीच निवडणूक लढवलेली नाही. पण युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात येत आहे. युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांची एक महत्त्वाची बैठक शिवसेना भवन येथे सोमवारी पार पडली. आदित्य ठाकरे यांना सक्रीय राजकारणात आणण्याचा निर्णय या बैठकीत झाल्याचे सांगण्यात आले आहे. आता आदित्य ठाकरे यांना संजय राऊत यांनी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार असल्याचं म्हटल्यानंतर भाजपकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहावं लागेल.

याआधी शिवसेना-भाजपमध्ये प्रत्येकी अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद वाटून घेण्याचा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्या बैठकीत निर्णय झाल्याचं ट्विट युवासेना सचिव वरूण सरदेसाई यांनी केलं होतं. जे नेते या वाटाघाटीला हजर नव्हते त्यांनी आपल्या स्वार्थासाठी युतीत खोडा घालण्याचं काम करू नये, असा टोलाही त्यांनी नाव न घेता अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना लगावला होता. त्यामुळे शिवसेना-भाजपमध्ये मुख्यमंत्रीपदावरुन दावे सुरु झाले आहेत.