पाकिस्तान आणि चीनला धडकी भरवणारी 'एडव्हान्स टोड आर्टिलरी गन'

पाकिस्तान आणि बीजिंगची झोप उडवणारी एक तोफ भारताने विकसीत केलीय.

Updated: Dec 21, 2020, 04:06 PM IST
पाकिस्तान आणि चीनला धडकी भरवणारी 'एडव्हान्स टोड आर्टिलरी गन' title=

ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया : पाकिस्तान आणि बीजिंगची झोप उडवणारी एक तोफ भारताने विकसीत केलीय. तिला एडव्हान्स टोड आर्टिलरी गन म्हणत असून शत्रुच्या काळजात धडकी भरवणारी तिची वैशिष्ट्य आहेत. आर्टिलरी गन ही विक्रमी एडव्हान्स टोड आर्टिलरी गन सिस्टीम आहे. या तोफेची फायरिंग एकाच वेळी बीजिंग आणि इस्लामाबादला घाम फोडतेय. आत्मनिर्भर भारताची छबी आहे ही एडव्हान्स टोड आर्टिलरी गन. ATAGS तोफ लवकरच आर्मीत पूर्ण ताकदीनीशी दाखल होत आहे. 155 एमएम आणि 52 कॅलिबरची ही तोफ जगातली सर्वात लांबवर मारा करणारी तोफ आहे. 

डीआरडीओने या तोफेच्या सर्व चाचण्या यशस्वी झाल्याचं जाहीर केलंय. एक किंवा दोन ट्रायल्सनंतर ही तोफ आर्मीत दाखल होत आहे. 155 एमएम क्लासमध्ये ही तोफ जगातली सर्वाधिक लांब रेंजची तोफ आहे. या तोफेला दाखल करून घेण्यास लष्कराने मान्यताही दिली आहे. ही तोफ पूर्णपणे इलेक्ट्रीक ड्रिव्हन आहे. त्यामुळे या तोफेच्या देखभाल दुरूस्तीचा खर्च कमालीचा कमी झालाय. 

३० सेकंदात ६ राऊंड्चा मारा करणारं मॅगझिन या तोफेला बसवलंय. स्वयंचलित प्रणालीद्वारे मारा करण्याची या तोफेची क्षमता आहे. ४८ किलोमीटर लांबवर असलेल्या लक्ष्याचा अचूक वेध ही तोफ घेते. या तोफेसह ६ ते ८ जणांचा क्रू असतो. एका तासांत तब्बल ३० गोळे डागण्याची या तोफेची क्षमता आहे. 

भारताच्या ताफ्यात याआधीच अमेरिकेची एम ७७७ ही अल्ट्रा लाईट तोफ आहे. पण तिची माऱ्याची क्षमता ४० किलोमीटर एवढी आहे. एडव्हान्स टोड आर्टिलरी गनची मारक क्षमता तब्बल ४८ किलोमीटर एवढी आहे. डीआरडीओने ही तोफ डेव्हलप केलीय. तर या तोफेचं उत्पादन कल्याणी समुहाच्या भारत फोर्जने केलंय. ही तोफ ९५ टक्के भारतीय बनावटीची आहे. ही तोफ शत्रूंसाठी अतिशय घातक आहे. सीमेवर कुरापती काढणाऱ्या पाकिस्तान आणि चीनसाठी ही निश्चितच वाईट बातमी आहे.