Cyrus Mistry Accident: सायरस मिस्त्री यांच्या अपघाती मृत्यूनंतरही प्रशासन झोपलेलंच? महामार्गाला जोडणारे अनधिकृत फाटे पुन्हा सुरु

Mumbai-Ahmedabad Highway : टाटा सन्सचे माजी अध्यक्ष आणि उद्योगपती सायरस मिस्त्री यांचे मुंबई - अहमदाबाद महामार्गावर रस्ते अपघातात निधन झाले होते. याप्रकरणी गाडी चालवणाऱ्या डॉ. अनाहिता पंडोल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यासोबत प्रशासनाने कारवाई करत महामार्गाला जोडणारे फाटे बंद केले होते.

Updated: Jan 4, 2023, 01:18 PM IST
Cyrus Mistry Accident: सायरस मिस्त्री यांच्या अपघाती मृत्यूनंतरही प्रशासन झोपलेलंच? महामार्गाला जोडणारे अनधिकृत फाटे पुन्हा सुरु title=
(फोटो सौजन्य - PTI)

Cyrus Mistry Accident : टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री (Cyrus Mistry death) यांचा मुंबई-अहमदाबाद महामार्गावर (Mumbai-Ahmedabad Highway) पालघर जिल्ह्यातील (Palghar News) डहाणूजवळील चारोटी येथे झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला होता. सायरस मिस्त्री हे पंडोल कुटुंबीयांसह अहमदाबादहून मुंबईकडे मर्सिडीज कारने येत होते. चारोटी नाक्याजवळील सूर्या नदीच्या पुलाच्या कठड्याला त्यांच्या भरधाव कारची धडक बसल्याने मागील बाजूला बसलेल्या सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांचा मृत्यू झाला होता. 

अनधिकृत फाटे पुन्हा सुरु

सायरस मिस्त्री यांच्या गाडीचा अपघात झाला त्या ठिकाणी रस्ता अरुंद होत जातो, मात्र त्याठिकाणी कोणताही माहिती देणारा फलक नव्हता. ज्या ठिकाणी हा अपघात झाला त्याठिकाणी रस्त्याची रचना अत्यंत खराब आहे, त्यामुळे हा भाग अपघात प्रवण क्षेत्र बनला आहे, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. या गंभीर अपघातानंतर मुंबई-अहमदाबाद महामार्गाला पालघर जिल्ह्याच्या हद्दीत जोडणारे अनधिकृत फाटे बंद करण्यात आले होते. मात्र आता बंद करण्यात आलेले अनधिकृत फाटे पुन्हा सुरु करण्यात आले आहेत.

प्रशासनाची कारवाई ठरली फोल

मुंबई-अहमदाबाद महामार्ग तीन पदरी आहे. मात्र ज्या ठिकाणी अपघात झाला ती जागा दोन लेनची आहे. अपघाताच्या ठिकाणी मात्र हा महामार्ग तीनवरुन दोन लेनचा होत असल्याचा सूचना देणारा फलकही नाही. मिस्त्री यांची गाडी दुभाजकाला धडकल्यानंतर गाडी पुलावर थांबली होती. या पुलावर चुकीच्या बाजूने कोणी ओव्हरटेक केल्यास या अरुंद रस्त्यावर अपघात होण्याची शक्यता असते. यासोबतच मिस्त्री यांच्या अपघातानंतर प्रशासनाने या महामार्गावर असेल्या पालघर जिल्ह्यातील ब्लॅक स्पॉट ओळखून कारवाई केली होती. पालघर जिल्ह्यातून महामार्गावर येण्यासाठी असलेले फाटे प्रशासनाने डिव्हायर टाकून बंद केले होते. मात्र आता हे फाटे पुन्हा सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहेत.

हॉटेल, पेट्रोल पंप चालकांच्या फायद्यासाठी फाटे पुन्हा सुरु?

मिस्त्री यांच्या अपघातानंतर प्रशासनाने महामार्गावरील 29 ब्लॅकस्पॉट ओळखून त्याठिकाणी सुरक्षेसंदर्भात उपाययोजना करण्यास सुरुवात केली होती. महामार्गावर असलेले फाटे बंद करत सूचना देणारे इशारे फलक लावण्यात आले होते. मात्र आता हे फाटे पुन्हा सुरु झाल्याचे दिसत आहेत. दुसरीकडे महामार्गावर असणाऱ्या हॉटेल आणि पेट्रोल पंप चालकांच्या फायद्यासाठी हे फाटे पुन्हा सुरु करण्यात आल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. मात्र आता यावर काय कारवाई होणार याकडे सर्वांकडे लक्ष लागले आहे.

कसा झाला सायरस मिस्त्री यांचा अपघात?

4 सप्टेंबर रोजी दुपारी गुजरातमधील उद्धवाडा येथून धार्मिक कार्यानंतर पंडोल कुटुंबियास मुंबईकडे परतताना मिस्त्री यांच्या मर्सिडीज बेंझ गाडीने चारोटीजवळील सूर्या नदीवरील पुलाच्या कठड्याला जोरदार धडक दिली. या अपघातात सायरस मिस्त्री, जहांगीर पंडोल यांचे निधन झाले होते, तर दरायस व डॉ. अनाहिता पंडोल या जखमी झाल्या होत्या. यानंतर काही दिवसांपूर्वी गाडी चालवणाऱ्या अनाहिता पंडोल यांच्याविरुद्ध बेदरकारपणे वाहन चालवण्याच्या कलमा अंतर्गत कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.