एलफिस्टनच्या दुर्दैवी अपघातानंतर मुंबईकर उद्विग्न मनाने कामावर

एलफिस्टन स्टेशनवरील त्या दुदैवी घटनेनंतर मुंबई पुन्हा एकदा उद्विग्न मनाने कामाला लागली. त्या घटनेनंतर आजचा दिवस (३, ऑक्टोबर) हा मुंबईकरांच्या आठवड्याचा पहिलाच दिवस आहे.

Updated: Oct 3, 2017, 11:01 AM IST
एलफिस्टनच्या दुर्दैवी अपघातानंतर मुंबईकर उद्विग्न मनाने कामावर title=

मुंबई : एलफिस्टन स्टेशनवरील त्या दुर्दैवी घटनेनंतर मुंबई पुन्हा एकदा उद्विग्न मनाने कामाला लागली. त्या घटनेनंतर आजचा दिवस (३, ऑक्टोबर) हा मुंबईकरांच्या आठवड्याचा पहिलाच दिवस आहे.

एलफिस्टन स्टेशनवरील त्या भयावह घटनेचे साक्षीदार असलेले ते ठिकाण आज पून्हा एकदा गर्दीने गजबजले आहे. जसे की, इथे काहीच झाले नव्हते. स्टेशनवरून नेहमी ये जा करणारे पादचारीही सुन्न मनाने हळहळ व्यक्त करत त्याच रस्त्याने येत- जात आहेत. काही हळवे आणि सहृदय मुंबईकर घटनास्थळावर श्रद्धांजली वाहात आहेत. वरवर सर्व ठिक वाटत असले तरी, या घटनेच्या ओल्या जखमा मुंबईकरांच्या मनाला वेदना देताना दिसत आहेत. प्रत्येक मुंबईकरांच्या ओठावर येणाऱ्या शब्दातून हे स्पष्ट जाणवत आहे.

ऐन दसऱ्याच्या तोंडावर एक दिवस आगोदरच (29 सप्टेंबरला) ही घटना घडली. या घटनेत मृत्यू पावलेल्यांचा आकडा सुरूवातीला २३ होता. मात्र, त्यात वाढ होऊन तो आता २९ वर पोहोचला आहे. या सुन्न करणाऱ्या घटनेचे सावट पूर्ण महाराष्ट्रातील दसरा सणावर दिसत होते. दरम्यान, दस-याची सुट्टी, त्यानंतर रविवार आणि सोमवारची गांधी जयंतीची सुट्टी, अशा जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे एलफिन्स्टन स्टेशनवर फारशी गर्दी नव्हती. मात्र, आता नवा आठवडा सुरु झालाय. त्यामुळे आपल्या कामानिमित्त बाहेर पडलेल्या मुंबईकरांना घटना घडलेला तो पूल वापरण्याऐवजी कोणताच पर्याय नाही.