संजय राठोड राजीनाम्यानंतर भाजप आक्रमक, फडणवीस यांची 'ही' मागणी

संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी राजीनामा दिला असला तरी भाजप मात्र अजूनही आक्रमकच ( BJP is aggressive) आहे.  

Updated: Feb 28, 2021, 06:51 PM IST
संजय राठोड राजीनाम्यानंतर भाजप आक्रमक, फडणवीस यांची 'ही' मागणी  title=
संग्रहित छाया

मुंबई : संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी राजीनामा दिला असला तरी भाजप मात्र अजूनही आक्रमकच ( BJP is aggressive) आहे. राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली आहे. तर प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हायला हवी होती, तर १५ दिवस लपून का बसलात, असा सवाल भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे. 

'मी राजीनामा दिला, विरोधकांनी घाणेरडे राजकारण केले'

 

पूजा चव्हाण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होण्यासाठी आपण राजीनामा दिल्याचे संजय राठोड यांनी म्हटले आहे. पूजा चव्हाणच्या मृत्यूनंतर विरोधकांनी घाणेरडे राजकारण केले आणि आपली प्रचंड बदनामी झाल्याचंही राठोड यांनी म्हटले आहे. त्यानंतर भाजपने आक्रमकपणा सोडलेला नाही. केवळ राजीनामा नको, आता गुन्हा दाखल करुन चौकशी करा, अशी मागणी भाजपने केली आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीतल्या मित्रपक्षांनी चेंडू शिवसेनेच्या कोर्टात टोलवला आहे. संजय राठोडप्रकरणी सखोल चौकशी होईल. त्यांनी राजीनामा दिलाय. त्यावर मुख्यमंत्री निर्णय घेतील असं अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक तसेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. 

मोठ्या दबावानंतर अखेर वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिला. संजय राठोड यांनी पत्नीसह वर्षावर जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि त्यांच्याकडे राजीनामा सोपवलाय. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण राठोड यांना भोवलंय आणि राजीनामा द्यावा लागलाय. राजीनामा देतो पण चौकशी पूर्ण होईपर्यंत राजीनामा स्वीकारु नका, अशी विनंती राठोड यांनी मुख्यमंत्र्यांना केल्याचं समजते आहे. 

पूजा चव्हाणनं आत्महत्या केल्यानंतर 20 दिवसांनी राठोड यांनी राजीनामा दिला आहे. उद्यापासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. त्याआधी विरोधक संजय राठोडांच्या राजीनाम्यासाठी प्रचंड आक्रमक झाले होते. राजीनाम्याशिवाय अधिवेशनाचं कामकाज चालू देणार नाही, असा इशारा विरोधकांनी दिला होता. अखेर अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला.