मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांचा 'एकेरी' उल्लेख केल्यामुळे स्टँडअप कॉमेडियन अग्रिमा जोशुआमुळे वाद निर्माण झाला आहे. जोशुआने तिच्या स्टँडअपमध्ये महाराजांच्या अरबी समुद्रातील पुतळ्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शिवप्रेमींनी तिच्यावर टीका केली. त्यानंतर आता मराठी अभिनेत्री केतकी चितळेने फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये तिने देखील छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख एकेरी केला आहे.
शिवाजी, फक्त एवढे ऐकले की आम्ही उगाच पेटून उठणार. मजकूर आम्हाला तसाही कधी कळतच नाही, कारण तेवढी आमची बुद्धीमत्ता मुळातच नाही. मग ३ वर्षाच्या मुलाची बौद्धिक पातळी असलेले स्वघोषित मावळे, शिवाजी हा एक शब्द ओळखतात आणि महाराजांच्या शिकवणीला फाट्यावर मारून, महाराजांच्या नावावर राजकारण करायचा पोकळ विनोद सुरू करतात. बरं, अशा वागण्यानी आपण आपली लायकी दाखवून देतोय हे त्यांच्या लक्षात येत नाहीच. अर्थात हे कळण्यासाठीही नखाएवढी अक्कल लागतेच म्हणा!
सोशल मिडीयावर 'मराठी' असा शब्द टाकून वाटेल तसा वणवा, काही लाईक्ससाठी पेटवणारे २० ते २५ वयोगटातील पोरे, ज्यांना खऱ्या आयुष्यात कुणी भाव अथवा नोकरी ही देणार नाही अशी कार्टी, या सर्कस चे रिंग मास्टर असतात. अरे मूर्खांनो, शालेय शिक्षण तरी घ्या! पण ते तरी कसे घेणार, कारण आमचे प्रेरणास्थान तर आर्ची (नाव ही मराठी नाही) आणि पर्शा! आम्ही फक्त भांडण करण्यासाठी महाराज, बाबासाहेब, फुले यांची नावे घेणार, त्यांनी लिहिलेल्या साहित्याचा अभ्यास कोण करणार!!
सुधारणा करा बाळांनो, शिका.
शिवाजी, फक्त एवढे ऐकले की आम्ही उगाच पेटून उठणार. मजकूर आम्हाला तसाही कधी कळतच नाही, कारण तेवढी आमची बुद्धीमत्ता मुळातच...
Posted by Ketaki Chitale on Friday, July 10, 2020
केतकी चितळेने केलेल्या या पोस्टला जवळपास १२० जणांनी शेअर केली आहे. तर यावर लोकांचा आक्रोश दिसून येत आहे. केतकीवर चहुबाजूंनी टीका होत आहे.