युतीच्या निर्णयानंतर कोणतीही नाराजी नाही - शिवसेना

 युतीच्या निर्णयानंतर शिवसेनेत कोणतीही नाराजी नसल्याची माहिती शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी दिली आहे. 

Updated: Feb 24, 2019, 09:26 AM IST
युतीच्या निर्णयानंतर कोणतीही नाराजी नाही - शिवसेना title=

मुंबई : युतीच्या निर्णयानंतर शिवसेनेत कोणतीही नाराजी नसल्याची माहिती शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी दिली आहे. युतीच्या घोषणेनंतर मुंबईतील शिवसेना भवनात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला राज्यातील शिवसेनेचे सर्व खासदार, जिल्हा संपर्कप्रमुख आणि तालुकाप्रमुख उपस्थित होते.  लोकसभा निवडणूक तयारी संदर्भात ही बैठक बोलावण्यात आली होती. युतीच्या निर्णयानंतर बदललेल्या राजकीय स्थितीचा आणि समीकरणांचा आढावा या बैठकीत घेण्यात आलाय. युतीत शिवसेनेला कोणत्या जागा वाढवून मिळतील हे लवकरच कळेल अशी माहितीही त्यांनी दिली.  

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत शिवसेना - भाजप युती झाली असली तरी भिवंडी आणि पालघर मतदार संघात युतीबाबत पेच कायम आहे. या दोन्ही मतदार संघावर शिवसेनेने दावा केला आहे. सध्या भिवंडीचे भाजप खासदार कपिल पाटील यांच्या विरोधात शिवसैनिकांमध्ये प्रचंड आक्रमकता दिसत आहे. जागावाटपात ही जागा भाजपच्या वाट्याला गेली तर आमचा कपिल पाटील यांच्या उमेदवारीला विरोध राहील, अशी भूमिका येथील सेना पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे.  

तर दुसरीकडे जालनामध्ये हीच स्थिती आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे कट्टर विरोधक अर्जुन खोतकर नाराज आहेत. युतीमुळे जालना मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. मात्र, गेल्या साडेचार वर्षांमध्ये दानवे यांनी शिवसेनेविरोधात उघडलेल्या मोहीमेमुळे येथील शिवसेना कार्यकर्त्यांत त्यांच्याविरोधात प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे शिवसेना स्वबळावर लढल्यास अर्जुन खोतकर त्यांच्याविरोधात निवडणूक लढवणार असल्याचे जवळपास निश्चित होते. मात्र, युतीच्या निर्णयामुळे हा पर्याय बंद झाल्याने खोतकर यांची कोंडी झाली झाली आहे.त्यातच उद्धव ठाकरे यांनी त्यांची भेट नाकारल्याने नाराजी उघडपणे दिसून येत आहे.