आदित्य ठाकरेंना अडचणीत आणण्याचा फडणवीसांचा प्रयत्न, मदतीला धावले अजितदादा

विधानसभेत आदित्य ठाकरेंच्या मदतीला धावले अजितदादा... 

Updated: Feb 26, 2020, 12:12 PM IST
आदित्य ठाकरेंना अडचणीत आणण्याचा फडणवीसांचा प्रयत्न, मदतीला धावले अजितदादा title=

दीपक भातुसे, मुंबई : मंत्री झाल्यानंतर पहिल्या अधिवेशनाला सामोरं जाणाऱ्या पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी पहिल्यांदा विधानसभेत प्रश्नाला उत्तरं दिली. प्रश्नोत्तराच्या तासात मुंबई व कोकण येथील पर्यटन योजनांसाठी विकास निधी उपलब्ध करून देण्याबाबत शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी प्रश्न विचारला होता. शिवसेना आमदार वैभव नाईक यांनीही निधी मंजूर केला तरी तो वापरला का गेला नाही, असा प्रश्न आदित्य ठाकरेंना विचारला. या प्रश्नावर पर्यटन मंत्री म्हणून आदित्य ठाकरे यांनी उत्तरं दिली. 

कोकण विकास पर्यटनासाठी राज्य सरकार वेगळा निधी देणार असल्याचं सांगत समुद्र पर्यटन, हॉटेल्स यासाठी सरकार धोरण आणणार असल्याचे आदित्य यांनी विधानसभेत सांगितलं. त्याचबरोबर सिंधुदुर्ग किल्ल्याला दिलेला निधी खर्च का झाला नाही, याची चौकशी करू असं आश्वासन आदित्य ठाकरे यांनी विधानसभेत दिलं. पर्यटनदृष्ट्या कोकण महत्वाचा आहे, तसंच राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पर्यटन महत्वाचं आहे, अस उत्तरही आदित्य यांनी दिलं. 

आदित्य ठाकरे यांना अडचणीत आणण्याच्या दृष्टीने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी विधानसभेत एक प्रश्न उपस्थित केला. मात्र या प्रश्नाला उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी उत्तर देत आदित्य ठाकरेंना अडचणीत येऊ दिलं नाही. एशियन डेव्हलपमेंट बँक ही पायाभूत प्रकल्पांच्या विकासासाठी निधी देते, मात्र पर्यटन विकासासाठी निधी दिला जात नाही, यासाठी सरकार काय करणार असा प्रश्न फडणवीस यांनी विचारला. खरं तर हा प्रश्न आदित्य ठाकरे यांना विचारला होता. मात्र ते अडचणीत येतील हे लक्षात येताच अजित पवारांनी हस्तक्षेप करत स्वतः उत्तर दिलं. अशा प्रकारे पहिल्यांदाच उत्तर देणाऱ्या आदित्य यांच्या साथीला अजित पवार धावून आले.