तुम्ही मासे खरेदीसाठी गेलात आणि कोळंबीचा एक वाटा 500 रुपये वगैरे सांगितला तरी तुम्ही 'बापरे एवढी महाग मासळी...' असं काहीतरी म्हणाल. मासे घ्यायचेच असतील तर तुम्ही नक्कीच तोलभाव करुन कमीत कमी किंमतीत मासळी विकत घेण्याचा प्रयत्न कराल. मात्र जपानमधील मासळी बाजारामध्ये दोन दिवसांपूर्वी झालेल्या सौद्यामधील रक्कम पाहून अनेकांचे डोळे विस्फारलेत. झालं असं की येथील मासळी लिलावामध्ये एका भल्या मोठ्या माश्यावर बोली लावण्यात आली. विशेष म्हणजे या माशाला लिलावाच्या शेवटी तब्बल 11 कोटी रुपयांची रक्कम मिळाली. तुम्हाला नक्कीच हा आकडा वाचून धक्का बसेल पण ही रक्कमही या वर्षातील लिलावामधील दुसरी सर्वोच्च रक्कम आहे.
जपानमधील ज्या माशाला 11 कोटींची किंमत मिळाली तो मासा मोटरसायकलच्या आकाराचा आहे. या माशाचं वजन 276 किलो इतकं असून त्याला एवढी किंमत मिळण्यामागील कारण म्हणजे हा ट्यूना प्रजातीचा मासा आहे. मिशलीन सुशी रेस्टॉरंट्सच्या ओनोडेरा ग्रुपने हा मासा खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे. टोकियो मासळी बाजारामध्ये वर्षाच्या सुरुवातीला मिळालेली ही सर्वोच्च बोली ठरली आहे. 1999 पासून अगदी आजपर्यंतच्या मासळी लिलावाचा इतिहास पाहिल्यास ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च रक्कम ठरली आहे.
गेल्या पाच वर्षांपासून या मासळी बाजारामध्ये मोठमोठे आणि श्रीमंत ग्राहक लिलावात सहभागी होत आहेत. या ठिकाणी हे श्रीमंत लोक अवाढव्य रकमेची बोली लावतात आणि मासा पसंत आला तर वाटेल ती रक्कम मोजून तो विकत घेतात. फक्त मासे खरेदीच नाही तर जास्तीत जास्त रक्कम मोजून प्रकाशझोतात येण्याचा या श्रीमंताचा विचार असतो अशी चर्चाही येथे मासेमारी करणाऱ्या स्थानिकांमध्ये आहे. मात्र या स्पर्धेचा स्थानिक मासेमारांना चांगलाच आर्थिक फायदा होत असल्याचं मागील काही वर्षांमध्ये दिसून आलं आहे.
ओनोडेरा ग्रुपच्या अधिकाऱ्यांनी या भव्य लिलावानंतर पत्रकारांशी चर्चा केली. यामध्ये त्यांनी या माशासाठी एवढी रक्कम का मोजली याबद्दलचा खुलासा केला. "हा ट्यूना मासा या नवीन वर्षात खवय्यांच्या दृष्टीकोनातून खूपच खास ठरणार आहे. खवय्यांसाठी हा ट्यूना मासा एक उत्तम खाद्यपदार्थ ठरेल आणि लोक तो अगदी चवीने आणि आवडीने खातील, असा आम्हाला विश्वास आहे," असं ओनोडेरा ग्रुपच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. यापूर्वीही या ग्रुपने मागील वर्षी 114 दशलक्ष रुपयांची बोली लावत मासा खरेदी केला होता.
2019 मध्ये 278 किलोचा ब्लूफिन मासा 333.6 दशलक्ष रुपये देऊन विकत घेण्यात आला होता. हीच ही या मासळी बाजारामधील लिलावातील आतापर्यंत मिळालेली सर्वोच्च रक्कम आहे. आतापर्यंतची सर्वाधिक मोठ्या रकमेची बोली ही सुशी झानमाई नॅशनल रेस्टॉरंटचे सर्वेसर्वा कियोशी किमुरा यांनी लावली आहे. त्यांनीही त्यावेळी ट्यूना मासाच खरेदी केला होता. यामुळेच त्यांना 'ट्यूना किंग' असे नाव पडले.
मात्र, कोरोनाच्या साथीच्या काळात टोकियोमधील मासळी बाजारात ट्यूना माश्याची मागणी घसरली होती. त्यामुळे त्यांना कवडीमोल भावही मिळत नव्हता. त्यावेळी सरकारने घालून दिलेल्या नियमांमुळे आणि बंधनांमुळे लोकांनी मांस खाण्याचं प्रमाण कमी झाल्याने मासेमारी करणाऱ्यांचे फार हाल झाले होते. मात्र आता पुन्हा त्यांना या महागड्या लिलावांच्या माध्यमातून 'अच्छे दिन' पाहायला मिळत आहेत.