शरद पवारांनी कमावलं ते दादांनी गमावलं...

राज्यातील अनेक नेते ईडीच्या चौकशीला घाबरत असताना शरद पवार यांनी स्वत:हून ईडीच्या कार्यालयात जाण्याचा धाडसी निर्णय घेतला होता.

Updated: Sep 27, 2019, 08:34 PM IST
शरद पवारांनी कमावलं ते दादांनी गमावलं... title=

मुंबई: राज्य सहकारी बँकेतील आर्थिक गैरव्यवहारप्रकरणात सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) शरद पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या हाती आयतेच कोलीत दिले होते. आपण बँकेच्या सभासद किंवा संचालकपदी कधीच नव्हतो. मग ईडीने आपल्यावर गुन्हा दाखल केलाच कसा, असा सवाल करत शरद पवार यांनी सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेतली होती. 

या माध्यमातून सरकार निवडणुकीच्या तोंडावर सूडाचे राजकारण करत असल्याचा आरोपही शरद पवार यांनी केला. मात्र, दिल्लीसमोर महाराष्ट्र कधी झुकणार नाही, अशी गर्जना करत शरद पवार यांनी भाजपला अंगावर घेतले होते. त्यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये पक्षगळतीमुळे मरगळ आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चैतन्य संचारले होते. 

राज्यातील अनेक नेते ईडीच्या चौकशीला घाबरत असताना शरद पवार यांनी स्वत:हून ईडीच्या कार्यालयात जाण्याचा धाडसी निर्णय घेतला होता. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि विरोधक सरकारवर तुटून पडले होते. आज सकाळपासूनही प्रसारमाध्यमांमध्ये शरद पवार यांची प्रचंड चर्चा होती. यावर भाजपचे नेते कोणतीही प्रतिक्रिया द्यायलाही तयार नव्हते. एकूणच राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला बॅकफूटवर ढकलले होते. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला मुव्हमेंटम मिळाल्याची चर्चा सुरु होती. 

मात्र, अजित पवार यांनी संध्याकाळी तडकाफडकी राजीनामा दिल्याने संपूर्ण नूरच पालटला. सकाळपासून राष्ट्रवादी भाजपला भारी पडणार अशी चर्चा सुरु झाली होती. मात्र, अजित पवार यांच्या राजीनाम्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मोठा झटका बसला. आगामी काळातही पक्षाला याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे शरद पवारांनी गेल्या दोन दिवसांमध्ये जे कमावले ते अजितदादांनी एका फटक्यात गमावले, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.