भाजप खासदार चिखलीकर भेटीनंतर अजित पवार म्हणालेत..

भाजपचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची भेट घेतली. 

Updated: Nov 30, 2019, 09:52 AM IST
भाजप खासदार चिखलीकर भेटीनंतर अजित पवार म्हणालेत..

मुंबई : भाजपचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर जोरदार चर्चा सुरु झाली. ही चर्चा सुरु होत असताना अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ही वैयक्तिक भेट होती. ते त्यांच्या ठिकाणी आहेत. मी माझ्या ठिकाणी आहे. त्यांचा पक्ष भाजप आहे आणि माझा राष्ट्रवादी आहे. पक्ष वेगळे असले तरी आम्ही एकमेकांचे शत्रू नाहीत. दुसऱ्या पक्षात मित्र असू शकत नाही का, असा सवाल करत ही भेट सदिच्छा भेट होती. कोणतेही राजकीय वळण देऊ नये, असे अजित पवार म्हणालेत. 

भाजपचे खासदार अजित पवारांच्या भेटीला 

चिखलीकरांची ही भेट सदिच्छा भेट होती, असे सांगत अजित पवार म्हणालेत ते कालच माझी भेट घेणार होते. तसे त्यांनी मला भेटीबाबत सांगितले होते. मात्र, मी कामात असल्याने मला त्यांना काल भेट देता आली नाही. त्यामुळे चिखलीकर यांनी आज भेट घेतली. या भेटीत राजकीय चर्चा झालेली नाही, असे स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिले. दरम्यान, विश्वासदर्शक ठरावाच्या दिवशी भाजपचे खासदार अजित पवार यांनी भेट घेतल्याने भेटीमागच्या कारणांबाबत उत्सुकता आणि आश्चर्य केले जात होते. याबाबत अजित पवार म्हणालेत, आम्ही हा विश्वासदर्शक ठराव १७० पेक्षा जास्त मतांनी जिंकू. बहुमत चाचणीचे चित्रिकरण होण्याची शक्यता आहे, त्यामुळे कोणी कोणाला मतदान केले तेही समजेल. त्यामुळे या भेटीला उगाच राजकीय रंग देऊ नका, असे ते म्हणालेत.

दरम्यान, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील उपमुख्यमंत्रीपदाबाबत भाष्य करण्याचे टाळले. पक्षाचा निर्णय आहे. पक्ष काय तो निर्णय घेईल. मी याबाबत बोलणे योग्य होणार नाही. पक्ष जी माझ्यावर जबाबदारी देईल, ती मी पार पाडेन. आधी बहुमत चाचणी होऊ द्या, पुढील जे काही निर्णय असतील ते तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते घेतील, असे अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.