Ajit Pawar: 'बायकोला खांद्यावर घेऊन नाचू शकतो, पण...'; अजितदादांनी सांगितला झिरवळांचा किस्सा अन् भरसभेत पिकला हशा!

Ajit Pawar In Mumbai NCP meeting:  अजित पवार यांनी योग दिनानिमित्त देखील सरकारला खर्चावरून टोले लगावले आणि विधानसभेचे उपाध्यक्ष व दिंडोरी मतदार संघाचे आमदार नरहरी झिरवळांचा (Narahari Ziraval) एक किस्सा सांगितला.

Updated: Jun 21, 2023, 07:09 PM IST
Ajit Pawar: 'बायकोला खांद्यावर घेऊन नाचू शकतो, पण...'; अजितदादांनी सांगितला झिरवळांचा किस्सा अन् भरसभेत पिकला हशा! title=
Ajit Pawar On Narahari Ziraval

Ajit Pawar On Narahari Ziraval: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा (NCP) मुंबईत आज कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात भाषण करताना अजित पवार (Ajit Pawar) यांनी काही महत्त्वाची वक्तव्य केली. विरोधी पक्षनेते पदाच्या जबाबदारीतून मुक्त करा, अशी मागणी अजित पवार यांनी केल्याने मोठी खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय. कार्यक्रमात बोलत असताना अजित पवार यांनी सरकारला जोरदार फटकारलं आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर त्यांनी आवाज उठवला. त्यावेळी त्यांनी योग दिनानिमित्त देखील सरकारला खर्चावरून टोले लगावले आणि विधानसभेचे उपाध्यक्ष व दिंडोरी मतदार संघाचे आमदार नरहरी झिरवळांचा (Narahari Ziraval) एक किस्सा सांगितला.

काय म्हणाले अजित पवार?

आज जागतिक योग दिनानिमित्त विधिमंडळासमोर कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाला मलाही बोलवण्यात आलं होतं. अंबादास दानवे आणि नरहरी झिरवळ यांना देखील आमंत्रित करण्यात आलं होतं. मात्र, झिरवळांनी काही उपस्थिती लावली नाही. त्यानंतर मी झिरवळ यांना का गेला नाहीत, असं विचारलं. त्यावर, पोट एवढं वाढलं की योगा होतच नाही बघा, असं झिरवळ म्हणाल्याचं अजित पवार म्हणतात. योगा नाही झाला की आजूबाजूचे लोकं वाढलेलं पोट बघतात. बायकोला खांद्यावर घेऊन नाचू शकतो, पण योगा काही होत नाही, असा किस्सा अजित पवारांनी (Ajit Pawar On Narahari Ziraval) सांगताच सभागृहात एकच हशा पिकला.

अजितदादा म्हणतात 'आता बस झालं...'

मला विरोधी पक्षनेतेपदासाठी काडीमात्र इंटरेस्ट नव्हता. मात्र, राष्ट्रवादीच्या आमदारांनी आग्रह केला आणि मी विरोधी पक्षनेता झालो. काहींचं म्हणणं आहे की, तू कडक वागत नाही. आता त्यांची गचोडी धरु का? पण आता बस झालं, असं म्हणताना अजित पवारांचा पारा चढल्याचं दिसून आलंय. मला संघटनात्मक जबाबदारी द्या, मला त्या पदावरून मुक्त करा, अशी मागणी अजित पवार यांनी शरद पवार, सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल आणि जयंत पाटील यांच्याकडे केली आहे.

आणखी वाचा - दमदार आमदार... पत्नीला खांद्यावर घेत नरहरी झिरवळ यांनी केला डान्स

दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी नरहरी झिरवाळ यांनी एक लग्न समारंभात चक्क आपल्या पत्नीला खांद्यावर घेत पारंपारिक डान्स केला होता. झिरवाळ यांच्या डान्सचा व्हिडिओ (Viral Video) सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होता. झिरवाळ आपल्या बोलण्याची शैलीसाठी आणि साध्या राहणीमानामुळे कायमच चर्चेत असतात. त्यामुळे अजित पवार आणि झिरवळ यांच्यातील विश्वास अजूनही कायम आहे. 2019 साली ज्यावेळी अजित पवारांनी पहाटेचा शपथविधी घेतला. त्यावेळी अजित पवार यांना भक्कम पाठिंबा देणारे नरहरी झिरवळ होते.