एका क्लिकवर पाहा नेमकं कुठे आहे निसर्ग चक्रीवादळ?

तुमच्यापासून वादळ किती दूर.... पाहा 

Updated: Jun 3, 2020, 03:36 PM IST
एका क्लिकवर पाहा नेमकं कुठे आहे निसर्ग चक्रीवादळ? title=
छाया सौजन्य- windy.com

मुंबई : हवामान खात्याकडून अंदाज वर्तवण्यात आल्यानुसार बुधवारी सकाळपासून किंबहुना मंगळवारी सायंकाळपासून मुंबईसह कोकण किनारपट्टीलगत असणाऱ्या अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यांना सुरुवात झाली. बुधवारी या वाऱ्यांचा जोर आणखी वाढला. वेळ पुढे जाऊ लागला तसतसं या वाऱ्यांनी वादळी स्वरुप धारण केलं. ही चाहूल होती निसर्ग या चक्रीवादळाचा प्रवास सुरु असल्याची. 

मुंबई, अलिबागच्या दिशेनं निघालेल्या या वादळानं रत्नागिरीमध्येही नागरिकांना धकडी भरली. मुंबईच्या किनाऱ्यांवर हे वादळ धडकण्यापूर्वीच त्याचा प्रवास हा शहरापासून ५० किलोमीटर दक्षिणेच्या दिशेनं सुरु झाला. परिणामी शहरावरील निसर्गचं सावट काहीसं कमी झालं. तरीही सावधगिरीचे निकष पाळण्यावर मात्र प्रशासनाकडून भर देण्यात आला. 

एकिकडे मुंबईवरचं संकट कमी झाल्याचं चित्र असतानाच दुसरीरकडे रायगडमध्ये मात्र वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. परिणामी अनेक वृक्ष उन्मळून पडले आहेत.

'या' व्हिडिओंमध्ये पाहा 'निसर्ग' चक्रीवादळाचं रौद्र रुप

निसर्ग चक्रीवादळ किनारपट्टीवर आदळल्यानंतर त्याची तीव्रता कमी होत जाईल. परंतु पुणे आणि नाशिक विभागातील जिल्ह्यांवर याचा परिणाम जाणवेल. नंदुरबार पर्यंत पाऊस असेल. दुपारी २ ते ३ च्या दरम्यान नाशिक जिल्ह्यात इगतपुरीच्या मार्गाने वादळ धडकू शकेल. ज्या कारणास्तव नागरिकांना प्रशासनाकून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. इगतपुरी, नाशिक, चांदवड या परिसरात वादळाचा प्रभाव राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.