'कोषामध्ये राहणाऱ्या अळीला आयुष्यातील मजा कधीच कळणार नाही'

आदित्य ठाकरेंच्या ट्विटला मिसेस फडणवीसांच उत्तर 

Updated: Feb 27, 2020, 12:09 PM IST
'कोषामध्ये राहणाऱ्या अळीला आयुष्यातील मजा कधीच कळणार नाही'

मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर 'बांगड्या घातल्या आहेत का?' अशी टीका केली होती. त्या टिकेला प्रत्युत्तर देत राज्यमंत्री आदित्य ठाकरेंनी ट्विट करून देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागावी अशी मागणी केली होती. यासंदर्भात ट्विट करणाऱ्या आदित्य ठाकरेंना ट्विटरवरून अमृता फडणवीसांनी टोला लगावला आहे. 

अमृता फडणवीस यांनी ट्विट करत आदित्य ठाकरेंना टोला लगावला होता. “कोषामध्ये राहणाऱ्या अळीला आयुष्यातील मजा कधीच कळणार नाही. आदित्य ठाकरे, तुमच्या पूर्वजांनी आरामात विणलेल्या रेश्माच्या जीवावर वैभवात राहून भरभराट झाल्यासारखं आहे तुमचं आयुष्य. देवेंद्र फडणवीस तुमच्या संघर्षाचा मला अभिमान आहे. भाजपाच्या प्रत्येक कष्टकरी सदस्याचाही मला अभिमान आहे,” असं ट्विट अमृता यांनी केलं होतं. या ट्विटमुळे पुन्हा एकदा हा विषय शमण्याच नाव घेत नाही. 

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस? 

एमआयएमचे आमदार वारीस पठाण यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन फडणवीसांनी शिवसेनेवर जाहीर भाषणामध्ये टीका केली होती. आझाद मैदान येथे मंगळवारी पार पडलेल्या भाजपाच्या राज्य सरकारविरोधातील आंदोलनामध्ये फडणवीस बोलत होते. “उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या पक्षाने बांगड्या घातल्या असतील पण आम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत. जशास तसे उत्तर कशा पद्धतीने देतात हे भाजपाला ठाऊक आहे. आमच्यामध्ये तेवढे सामर्थ्य आहे,” अशी टीका फडणवीस यांनी शिवसेनेवर केली होती. यातूनच वादाला सुरूवात झाली होती.