मुंबई : अंधेरी पोटनिवडणुकीसाठी (Andheri By Election) महाविकास आघाडीकडून आमदार रमेश लटके (Ramesh Latke) यांच्या पत्नी ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांची उमेदवारी जवळपास निश्चित आहे. मात्र दुसऱ्या बाजूला भाजप-शिंदे गटाकडून (Bjp-Eknath Shinde Group) उमेदवार ठरला नव्हता. उमेदवारीसाठी अर्ज करण्याचा 14 ऑक्टोबर हा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे भाजपकडून कुणाला उमेदवारी मिळणार, याबाबत सर्वांनाच उत्सूकता लागून राहिली होती. मात्र अखेर भाजप-शिंदे गटाचा उमेदवार ठरला आहे. (andheri by election 2022 bjp shinde group give candidature to murji patel against to mva candidate rutuja latke)
भाजप-शिंदे गटाकडून मुरजी पटेलांना (Murji Patel) उमेदवारी देण्यात आली आहे. मुरजी पटेल यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती. मात्र पक्षाचा आदेश आला तर मी माघार घेईल, असंही मुरजी पटेल यांनी सांगितलं होतं. तर दुसऱ्या बाजूला पोटनिवडणुकीतील वाढता पेच पाहता शिंदे गटही उमेदवार देण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यामुळे मुरजी पटेल वेटिंगवर होते. मात्र अखेर शेवटच्या क्षणी भाजप-शिंदे गटाकडून मुरजी पटेल यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
मुरजी पटेल शुक्रवारी 14 ऑक्टोबरला आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अर्ज भरण्यासाठी जाताना मुरजी पटेल शक्तीप्रदर्शन करणार आहेत. यावेळेस जवळपास 25 हजार लोकं उपस्थित असतील असा दावा करण्यात येत आहे.
तर दुसऱ्या बाजूला मुंबई उच्च न्यायालयाने ऋतुजा लटके यांचा राजीनामा शुक्रवारी सकाळी 11 वाजेपर्यंत मंजूर करावा, असे आदेश बीएमसीला दिले आहेत. ऋुतुजा लटके या महापालिकेत क श्रेणी कर्मचारी असून लिपीक पदावर कार्यरत होत्या.
मात्र निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी पदाचा राजीनामा दिला. मात्र राजीनामा स्वीकार न झाल्याने पेच निर्माण झाला. यानंतर ठाकरे गटाने उच्च न्यायालयात दाखल केला. त्यानंतर शुक्रवारी 11 पर्यंत राजीनामा स्वीकार करावा, असे आदेश दिले आहेत. त्यामुळे लटके यांचाही उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला आहे.
दरम्यान दोन्ही गटाचे उमेदवार ठरल्याने अंधेरीत पोटनिवडणुकीसाठी मशाल विरुद्ध ढाल तलवार असा सामना रंगणार आहे. या सामन्यात कोण बाजी मारणार, याकडे उभ्या महाराष्ट्राच्या राजकारणाचं लक्ष असणार आहे.
पटेल हे भाजपचे माजी नगरसेवक राहिले आहेत. पटेल 2019 मध्ये लटके यांच्याविरोधात अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते.
राज्यात 2019 मध्ये शिवसेना-भाजप यूती जाहीर झाली होती. त्यामुळे अंधेरी पूर्व विधानसभेची जागा ही शिवसेनेच्या वाट्याला गेली होती. त्यामुळे पटेल यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली होती.
या निवडणुकीत रमेश लटके यांनी पटेल यांचा 16 हजार 965 इतक्या मतांच्या फरकाने विजय मिळवला होता. मात्र उल्लेखनीय बाब अशी की अपक्ष निवडणूक लढवूनही पटेल यांनी दुसऱ्या क्रमांकाची मतं घेतली होती. पटेल यांना 45 हजार 808 मतं मिळाली होती.
पटेल 'जीवन ज्योत प्रतिष्ठान' या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून घराघरात पोहचले आहेत. त्यांची आपल्या भागावर घट्ट अशी पकड आहे. त्यांना मानणारा आणि जाणणारा असा एक वर्ग आहे.