मुंबई : भाजप आमदार आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या बंगल्यावर पोहोचले आहेत. अंधेरी पोटनिवडणुकीच्या (Andheri Bypoll) संदर्भात बैठक होत असल्याची माहिती आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध करावी असे आव्हान भाजपला केले आहे. त्यामुळे आता उद्या अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. अंधेरी पोटनिवडणुकीतील भाजपचे उमेदवार मुरजी पटेल ही बैठकीसाठी पोहोचले आहेत.
भाजपनं अंधेरी पोटनिवडणूक लढू नये. ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांची बिनविरोध निवड व्हावी. असं पत्र राज ठाकरे यांनी फडणवीसांना लिहिलं आहे. त्यानंतर आता शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं आहे. अंधेरी पोटनिवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याची उद्या शेवटची तारीख आहे. त्यामुळे या बैठकीत भाजप काय निर्णय घेणार, याकडे लक्ष लागलंय.
राज ठाकरे यांनी पाठवलेल्या पत्राचा विचार करणार असल्याची प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. 'सर्व नेत्यांशी चर्चा करुन पोटनिवडणुकीबद्दल निर्णय घेण्यात येईल, असं ते म्हणाले होते. तर भाजपनंच राज ठाकरेंना पत्र लिहायला लावलं का, असा सवाल ठाकरे गटाच्या अरविंद सावंत यांनी केला होता.