मुंबई : एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्याच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. या संपामध्ये सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर सरकारने निलंबनाची कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. लोकांना वेठीला धरले तर सरकार हातावर हात ठेवून बसणार नाही असा इशारा परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी दिला आहे.
झी24तास सोबत बोलताना त्यांनी म्हटलं की, 'कृती समितीच्या मागण्या मान्य केल्या होत्या. त्यामुळं मी त्यांना कामगारांशी बोलून संप मागे घेण्याचे आवाहन केले. विलिनीकरणाच्या बाबतीत हायकोर्टाने नेमलेली समिती 12 आठवड्याच्या आत निर्णय देईल. सदाभाऊ खोत यांना समजावून सांगितले की एक दोन दिवसांत प्रश्न सुटणार नाही. मध्येच वेतनवाढीचा निर्णय घेणं शक्य नाही. समितीच जो काय तो निर्णय घेईल.'
'लोकांना वेठीला धरले तर सरकार हातावर हात ठेवून बसणार नाही. कोर्टाने संप बेकायदेशीर ठरवला आहे. संप मागे घ्या मग कारवाई मागे घेण्याचे बघतो. चर्चेची द्वारे खुली आहेत, पण कोर्टाच्या निर्णयाचा अनादर करणार नाही. भाजपचे नेतेच संप करण्यासाठी पुढे आले होते. प्रविण दरेकरांनी शब्द दिला होता की, संप मागे घेण्यासंदर्भात. पण त्यांचे बहुधा कर्मचा-यांनी ऐकले नाही.'