धक्कादायक! मोबाईलवर गेम खेळण्यावरुन भावासोबत वाद, बहिणीची विषारी औषध पिऊन आत्महत्या

केवळ मोबाईलवर गेम खेळण्यास दिला नाही म्हणून मुलीने टोकाचं पाऊल उचललं

Updated: Sep 13, 2021, 02:48 PM IST
धक्कादायक! मोबाईलवर गेम खेळण्यावरुन भावासोबत वाद, बहिणीची विषारी औषध पिऊन आत्महत्या title=
संग्रहित फोटो

मुंबई : मोबाईवर गेम खेळण्यावरुन भावासोबत वाद झाल्याने एका 16 वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मुंबईत समोर आली आहे. कांदिवलीत ही घटना घडली आहे. याप्रकरणी समता नगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

नेमकी घटना काय?

कांदिवलीतल्या समता नगरमध्ये राहणाऱ्या या कुंटुबाची परिस्थिती जेमतेम आहे. शुक्रवारी रात्री मोबाईवर गेम खेळण्यावरुन या दोघांमध्ये भांडण झालं. भावाने मोबाईल देण्यास नकार दिला. क्षुल्लक कारणावरुन झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन मुलीने उंदिर मारण्याचं औषध घेतलं. यानंतर तिची तब्येत बिघडली, मुलीला तात्काळ जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं. पण दुसऱ्या दिवशी उपचारादरम्यान तीचा मृत्यू झाला.

समता नगर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित मुलीचा तिच्या लहान  भावासोबत मोबाईल गेम खेळण्यावरुन वाद झाला. रागीट स्वभावाच्या या मुलीने जवळच्या मेडिकल स्टोअरमधून उंदीर मारण्याचं औषध आणलं आणि ते लहान भावासमोरच प्यायली. त्यानंतर लहान भावाने आपल्या आई-वडिलांना याची माहिती दिली. मुलीला लगेच रुग्णालयात भरती करण्यात आलं. उपचार सुरु असताना या मुलीचा मृत्यू झाला. या प्रकरणी आणखी पोलीस तपास सुरु आहे.