ईशान्य भारतातल्या निकालानंतर आशिष शेलारांचा शिवसेनेवर निशाणा

ईशान्य भारतात झालेल्या राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपनं घवघवीत यश मिळवलं आहे. 

Updated: Mar 3, 2018, 08:40 PM IST
ईशान्य भारतातल्या निकालानंतर आशिष शेलारांचा शिवसेनेवर निशाणा title=

मुंबई : ईशान्य भारतात झालेल्या राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपनं घवघवीत यश मिळवलं आहे. त्रिपुरामध्ये भाजपला बहुमत मिळालं आहे. या राज्यामध्ये २५ वर्ष असलेली डाव्यांची सत्ता भाजपनं उलथवून लावली आहे. तर नागालँडमध्येही भाजप सगळ्यात मोठा पक्ष ठरला आहे. ६० मतदारसंघाच्या या राज्यामध्ये भाजपला २९ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे नागालँडमध्येही भाजपचाच मुख्यमंत्री होईल हे निश्चित मानलं जात आहे.

मेघालयमध्ये मात्र काँग्रेस हा सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष बनला आहे. ५९ मतदारसंघाच्या या राज्यामध्ये काँग्रेसला २१ जागा मिळाल्या आहेत. तर भाजपला २ जागांवर यश मिळालं आहे.

आशिष शेलार यांचा शिवसेनेवर निशाणा

ईशान्य भारतात भाजपला मिळालेल्या यशानंतर भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेनेवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. "देशातील प्रत्येक कानाकोप-यातील जनता भाजपच्या सोबतच आहे हे पुन्हा पुन्हा सिध्द होते आहे... पण  तरीही काहींना अॅसिडीटी, मळमळ...पोटदुखी ही होईल ? ती उद्या कदाचित अग्रलेखातून दिसेलही ? "आज नाखुश तो बहुत होगे तुम…..! " असं ट्विट आशिष शेलार यांनी केलं आहे.