मुंबईच्या महापौरांसहीत ११ नगरसेवकांना आमदार होण्याचे वेध

काही माजी नगरसेवकही या निवडणुकीत आपलं नशिब आजमावत आहेत

Updated: Oct 6, 2019, 03:07 PM IST
मुंबईच्या महापौरांसहीत ११ नगरसेवकांना आमदार होण्याचे वेध title=

गणेश कवडे-कृष्णात पाटील, झी २४ तास, मुंबई : मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्यासह ११ नगरसेवकांना आमदार होण्याचे वेध लागलेत. याबरोबरच काही माजी नगरसेवकही या निवडणुकीत नशिब आजमावत आहेत. मुंबईतल्या ३६ विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक आजी-माजी आमदार रिंगणात असताना अनेक नगरसेवकांनाही विधानसभेत जाण्याचे वेध लागलेत. विविध पक्षांच्या ११ विद्यमान नगरसेवक मैदानात उतरलेत. यातले ९ जण अधिकृत उमेदवार आहेत. 

- दस्तुरखुद्द महापौर विश्वनाथ महाडेश्वरांनी वांद्रे पूर्व मतदारसंघातून शिवसेनेकडून अर्ज दाखल केलाय

- शिवसेना नगरसेवक रमेश कोरगावकर भांडूपमधून

- दिलीप लांडे चांदीवलीमधून रिंगणात आहेत 

- काँग्रेसतर्फे आसिफ झकेरीया वांद्रे पश्चिममधून

- तर जगदिश अमीन कुट्टी अंधेरी पूर्व मतदारसंघातून निवडणूक लढवतायत

- महापालिकेतले सर्वात श्रीमंत नगरसेवक पराग शाह यांना भाजपानं घाटकोपर पूर्वमधून उमेदवारी दिलीय

- समाजवादी पक्षाचे नगरसेवक रईस शेख भिवंडीतून निवडणूक लढवत आहेत

- मनसेचे संजय तुर्डे यांनी कालिना मतदारसंघातून अर्ज भरलाय

- अखिल भारतीय सेनेच्या गीता गवळीही भायखळ्यातून मैदानात उतरल्या आहेत

- या ९ अधिकृत उमेदवारांखेरीज शिवसेनेच्या नगरसेविका राजूल पटेल यांनी वर्सोवामधून बंडखोरी केलीय

- तर काँग्रेस नगरसेवक सुफियान वणू मानखूर्द शिवाजीनगर येथून अपक्ष लढत आहेत

काही माजी नगरसेवकही या निवडणुकीत आपलं नशिब आजमावत आहेत

- शिवसेनेचे विठ्ठल लोकरे मानखुर्द शिवाजीनगर येथून

- यामिनी जाधव भायखळ्यातून निवडणूक लढत आहेत

- काँग्रेसचे माजी नगरसेवक सुरेश कोपरकर भांडुपमधून

- अजंता यादव कांदिवली पूर्व मतदारसंघात रिंगणात उतरल्या आहेत

- राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक धनंजय पिसाळ हे विक्रोळीतून लढत आहेत

- प्रमाणपत्र अवैध ठरल्यानं नगरसेवकपद रद्द झालेले भाजपाचे मुरजी पटेल यांनी बंडखोरी करत अंधेरी पूर्वमधून अर्ज भरलाय

- शिवसेनेचे माजी नगरसेवक संजय भालेराव घाटकोपर पश्चिम मतदारसंघातून अपक्ष लढत आहेत

आशियातील सर्वात मोठी आणि श्रीमंत महापालिकेचा्या कारभाराचा अनुभव या नगरसेवकांच्या गाठिशी आहे. आता यातल्या किती जणांना जनता बढती देते, हे निकालावेळी स्पष्ट होईल.