रिक्षाचालकाचा पुरुष प्रवाशावर लैंगिक अत्याचार, मुंबईतील धक्कादायक घटना; गार्डनमध्ये नेलं अन्...

Crime: मद्यधुंद अवस्थेत असणारा प्रवासी रिक्षाचालकाला अनेक ठिकाणी फिरवत होता. त्याला आपल्याला नेमकं कुठे जायचं आहे हे समजत नव्हतं. यामुळे रिक्षाचालक आणि प्रवाशात मोठा वाद झाला. यानंतर रिक्षाचालकाने चक्क त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि नंतर लुटलं.   

शिवराज यादव | Updated: Jun 8, 2023, 11:35 AM IST
रिक्षाचालकाचा पुरुष प्रवाशावर लैंगिक अत्याचार, मुंबईतील धक्कादायक घटना; गार्डनमध्ये नेलं अन्... title=

Crime News: मुंबईत (Mumbai) एका पुरुष प्रवाशावर लैंगिक अत्याचार (Sexual Assault) करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी याप्रकरणी 25 वर्षीय रिक्षाचालकाला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवासी मद्यधुंद अवस्थेत होता. यादरम्यान भाड्यावरुन वाद झाल्याने रिक्षाचालकाने चक्क पुरुष प्रवाशावरच लैंगिक अत्याचार केला. यानंतर त्याने त्याला लुटलं. 

शनिवारी रात्री घाटकोपरमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. 31 वर्षीय पुरुष प्रवाशाने रिक्षा बूक केली होती. यावेळी प्रवाशाने मद्यपान केल्याने तो मद्यधुंद अवस्थेत होता. यामुळे त्याच अवस्थेत त्याला आपल्याला नेमकं कुठे जायचं आहे हे समजत नव्हतं. याच अवस्थेत त्याने रिक्षा अनेक ठिकाणी नेली असं पोलिसांनी सांगितलं आहे. 

"जवळपास तासाभरानंतर प्रवासी रिक्षामधून खाली उतरला. जेव्हा रिक्षाचालकाने 250 रुपये मागितले तेव्हा प्रवाशाने त्याच्या हातावर 100 रुपयांची नोट टेकवली. यामुळे दोघांमध्ये वाद सुरु झाला. रागाच्या भरात चालकाने प्रवाशाला जबरदस्ती जवळच्या गार्डनमध्ये नेलं आणि  जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले," अशी माहिती अधिकाऱ्याने दिली आहे.

त्यानंतर, रिक्षाचालकाने प्रवाशाला त्याच्यासह एटीएममध्ये नेलं आणि 200 रुपये काढण्यास भाग पाडलं. चालकाने त्याची सुटका करण्यापूर्वी त्याचा मोबाईल फोन आणि एटीएम कार्ड हिसकावून घेतले.

मंगळवारी प्रवाशाने पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि मोबाइल फोन चोरी झाल्याची तक्रार दिली. पोलिसांना खोदून विचारलं असता सुरुवातीला संयम बाळगलेल्या त्याने संपूर्ण घटना कथन केली, असे पोलिसांनी सांगितले.

अधिकार्‍यांनी भारतीय दंड संहिताच्या (IPC) संबंधित कलमांतर्गत एफआयआर नोंदवला, ज्यात 377 (सहमतीने अनैसर्गिक लैंगिक संभोग) आणि 394 (स्वेच्छेने दरोडा घालताना दुखापत करणे) यांचा समावेश आहे. तक्रारीच्या आधारे रिक्षा चालकाला अटक करण्यात आली असल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.