Baba Siddique Shot Dead : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीक यांच्यावर शनिवारी (12 ऑक्टोबर) रात्री 9.30 वाजता तीन अज्ञात व्यक्तींनी गोळ्या झाडल्या. त्यानंतर बाबा सिद्दीकी यांना तात्काळ लीलावती रुग्णालयात नेले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सिद्दीकी हत्या प्रकरणात पोलिसांनी दोन हल्लेखोऱ्यांना अटक केली आहे तर एक मारेकरी फरार आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुमारे दोन आठवड्यांपूर्वी बाबा सिद्दीकी यांना धमकीचं पत्र मिळालं होतं. त्यानंतर पोलिसांना त्यांच्या बंदोबस्तात वाढ करण्यात आली होती. पण शनिवारची रात्र त्यांच्यासाठी कालरात्र ठरली.
बाबा सिद्दीकी त्यांच्या आलिशान जीवनशैली आणि स्टार-स्टडेड हाय-क्लास पार्ट्यांसाठी आणि बॉलिवूड इफ्तार पार्टीसाठी ओळखले जायचे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या हत्याकांडाची संशयाची सुई साबरमती तुरुंगात कैद असलेल्या लॉरेन्स बिश्नोई गँगकडे आहे. बाबा सिद्धीकी आणि सलमान खान यांचे घनिष्ट संबंध होते. सलमान खानसोबत असलेल्या मैत्रीमुळंच लॉरेन्सने बाबा सिद्धीकी यांच्यावर हल्ला केला असू शकतो, असा प्राथमिक अंदाज बांधण्यात येत आहे. तर पोलिसांनी ही हत्या संपत्तीच्या वादातून (Baba Siddique Net worth) झाल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
माजी मंत्री राहिलेले बाबा सिद्दीकी यांच्या शिक्षणाबद्दल बोलायचं झालं तर ते बारावी पास होते. तर निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार बाबा सिद्दीकींची संपत्ती ही 76 कोटी एवढी आहे. मात्र, त्याच्या खऱ्या संपत्तीची अचूक माहिती अद्याप कुठेही उपलब्ध नाहीत.
2018 मध्ये, ईडीने सिद्दीकी यांची 462 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. ईडीने मुंबईतील सिद्दीकी आणि पिरॅमिड डेव्हलपर्सचे सुमारे 462 कोटी रुपयांचे 33 फ्लॅट जप्त केले होते त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ माजली होती. वांद्रे येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील अनियमितता आणि मनी लाँड्रिंगसारख्या कामांबाबत ही कारवाई करण्यात आली होती. हा कथित घोटाळा सुमारे 2000 कोटी रुपयांचा असल्याचे सांगण्यात आले. पिरॅमिड डेव्हलपर्स ही बाबा सिद्दीकी यांची शेल कंपनी होती.
त्यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात दिलेल्या त्यांच्या मालमत्तेच्या तपशिलांमध्ये रोख रक्कम, बँक ठेवी आणि अनेक कंपन्यांमधील शेअर्ससह विविध प्रकारच्या चल मालमत्तेच्या मालकीचा समावेश आहे. त्याच्याकडे महागडे दागिने, आलिशान कार अशा अनेक गोष्टी होत्या. प्रतिज्ञापत्रात त्याची किंमत सुमारे 30 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सोन्याचे आणि हिऱ्यांचे दागिने आहेत. मर्सिडीज बेंझ एस क्लास, बीएमडब्ल्यू 7 सीरीज आणि रोल्स रॉयस फँटम कार आहेत.