Baba Siddiqui Murder News: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्धीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची खळबळनजक घटना घडली आहे. शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास वांद्रे येथे त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या प्रकरणात पोलिसांनी दोघांना अटक केली असून यामागे लॉरेन्स बिश्नोई गँगचा हात असल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे.
बाबा सिद्धीकी यांना Y दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती. तरीदेखील त्यांचावर हल्ला झाल्याने त्यांच्या सुरक्षेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. मुंबई पोलिसांची क्राइम ब्रँच टीम तपासाला लागली आहे. इतकंच नव्हे तर, दिल्ली पोलिसांची स्पेशल सेलची काउंटर इंटेलिजेन्स युनिटदेखील मुंबई पोलिसांना मदत करत आहे. या प्रकरणात दिल्ली पोलिसांची स्पेशल सेलदेखील तपास करणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या हत्याकांडाची संशयाची सुई साबरमती तुरुंगात कैद असलेल्या लॉरेन्स बिश्नोई गँगकडे आहे. बाबा सिद्धीकी आणि सलमान खान यांचे घनिष्ट संबंध होते. सलमान खानसोबत असलेल्या मैत्रीमुळंच लॉरेन्सने बाबा सिद्धीकी यांच्यावर हल्ला केला असू शकतो, असा प्राथमिक अंदाज बांधण्यात येत आहे. दरम्यान, साबरमती जेलमध्ये गेल्या 9 दिवसांपासून लॉरेन्सने मौन व्रत धारण केले आहे.
#WATCH | Mumbai: Actor Salman Khan at Lilawati Hospital to meet the family of Baba Siddiqui who succumbed to bullet injuries, late night, yesterday. pic.twitter.com/GkXkzE5SVn
— ANI (@ANI) October 12, 2024
बाबा सिद्धीकी यांच्या हत्या प्रकरणात आणखी एक माहिती समोर येत आहे. ती म्हणजे, SRA प्रकल्पामुळं झालेल्या वादातूनही त्यांची हत्या करण्यात आली असावी, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. गृहमंत्रालयाच्या सूत्रांनुसार, मुंबई पोलिस बाबा सिद्धीकी यांच्या एसआरए प्रकल्पासंबंधितदेखील तपास करत आहेत. पोलिसांना संशय आहे की संपत्तीच्या वादातूनही त्यांच्यावर हल्ला करण्यात आला असू सकतो. मात्र, अद्याप तपास यंत्रणांकडे ठोस पुरावे नाहीयेत.
बाबा सिद्धीकी यांच्यावर तीन जणांनी गोळ्या झाडल्या. तीन पैकी एका दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर, एक आरोपी फरार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी उत्तर प्रदेश, हरियाणा या राज्यातून आहेत. तर तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे. मुंबई पोलिसांसोबतच दिल्ली पोलिस, यूपीएसटीएफ आणि हरियाणा पुलिसांचे सीआईए पथक आरोपींचा शोध घेत आहेत.