Firing on Baba Siddique : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेमुळे राजकारणात खळबळ उडाली आहे. या घटनेने राजकारण सुद्धा तापले आहे. Y दर्जाची सुरक्षा असतानाही त्यांच्यावर तीन जणांंनी हा हल्ला केला. अशात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
बाबा सिद्दीकी हे त्यांचा मुलगा झिशान याच्या कार्यालय परिसरात असताना, 3 जणांनी त्यांच्यावर गोळीबार केला. यातली 1 गोळी बाबा सिद्दीकी यांच्या छातीत लागली होती. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले, ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. मी पोलिस आयुक्तांशी बोललो असून या प्रकरणी 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच फरार आरोपीला तातडीने ताब्यात घेऊन कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी राज्यमंत्री, विधिमंडळात प्रदीर्घकाळ राहिलेले माझे सहकारी बाबा सिद्दीकी यांच्यावर झालेल्या गोळीबाराची घटना अत्यंत दुर्दैवी, निषेधार्ह आणि वेदनादायी आहे. या घटनेत त्यांचं निधन झाल्याचं समजून मला धक्का बसला. मी माझा चांगला सहकारी, मित्र गमावल्याचे ट्विट अजित पवार यांनी केले.
राज्याची कोलमडलेली कायदा सुव्यवस्था चिंता वाढवणारी आहे. देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईत माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांच्यावर झालेला गोळीबार खेदजनक आहे. गृहमंत्री आणि सत्ताधारी एवढ्या सौम्यतेने राज्याचा गाडा हाकणार असतील तर सामान्य जनतेसाठी धोक्याची घंटा ठरू शकते असे ट्विट शरद पवार यांनी केले आहे.
मुंबईतील माजी आमदार व मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची बातमी अतिशय दुःखद आणि दुर्दैवी आहे. त्यांच्यासारख्या बुजुर्ग नेत्याला भररस्त्यात गोळी झाडून मारण्यात आले. पुणे असो किंवा मुंबई राज्यातील कायदा सुव्यवस्थेची दुर्दशा दाखविणारी ही आणखी एक घटना असे ट्विट सुप्रिया सुळे यांनी केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, राज्याचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचे वृत्त अत्यंत दु:खद आणि धक्कादायक आहे. काँग्रेस पक्षात आणि राज्याच्या मंत्रीमंडळात आम्ही अनेक वर्ष एकत्र काम केले होते. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली असे ट्विट बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
माझे जवळचे मित्र, माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचे वृत्त अतिशय धक्कादायक व हादरवून टाकणारे आहे. आम्ही विधीमंडळात एकत्र काम केले. मंत्रिमंडळातही आम्ही सोबत होतो. त्यांचे नेतृत्व लोकांशी नाळ जुळलेले व सर्व समाजात सर्वमान्य असे नेतृत्व होते असे ट्विट अशोक चव्हाण यांनी केले आहे.