शेतकऱ्यांना मदत द्या, यासाठी बच्चू कडूंचा मोर्चाचा प्रयत्न, कार्यकर्त्यांवर सौम्य लाठीमार

प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी राजभवनावर मोर्चा काढला. पण याआधीच बच्चू कडू यांना पोलिसांनी नरिमन पॉईंट भागात अटक केली.

Updated: Nov 14, 2019, 01:02 PM IST
शेतकऱ्यांना मदत द्या, यासाठी बच्चू कडूंचा मोर्चाचा प्रयत्न, कार्यकर्त्यांवर सौम्य लाठीमार

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : प्रहारचे आमदार बच्चू कडू यांच्याकडून राजभवनावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न झाला. पण याआधीच बच्चू कडू यांना पोलिसांनी नरिमन पॉईंट भागात अटक केली.  बच्चू कडू यांना स्थानबद्ध केल्यानंतर जेव्हा पोलीस घेऊन जात होते, त्या गाडीपुढे शेतकरी आणि कार्यकर्ते झोपून बच्चू क़डू यांना ताब्यात घेण्याला विरोध करत होते. बच्चू कडू यांना ताब्यात घेण्याचा विरोध करताना महिला कार्य़कर्त्या देखील दिसून आल्या आहेत.

बच्चु कडू, त्यांचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये मोठ्या प्रमाणात झटापट होत आहे, नरिमन पॉईन्ट परिसरात वाहतूक काही काळ खोळंबली होती. नरिमन पॉईंट हा कॉर्पोरेट भाग ग्रामीण शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या घोषणांमुळे दणाणला आहे. यावेळी कार्यकर्त्यांवर पोलिसांनी सौम्य लाठीमारही केला आहे.

बच्चू कडू यांना राजभवनावर मोर्चा घेऊन जाणार होते, पण पोलिसांनी त्या आधीच बच्चू कडू यांच्यासह काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. कार्यकर्त्यांची संख्या एवढी होती की, पोलिसांची एक पिंजरा गा़डी देखील कमी पडली, यानंतर कार्यकर्त्यांना अटक कऱण्यासाठी दुसरी गाडी दाखल झाली आहे.

राज्यात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी बच्चू कडूंची आहे. भरपाईची मागणी करण्यासाठी शेतकरी खराब झालेलं पिक देखील हातात घेऊन आले होते.

इंग्रजांसारखी दडपशाही सुरू आहे, आमच्या कार्य़कर्त्यांना रेल्वेस्टेशनवरही ताब्यात घेण्यात आल्याचं शेतकऱ्यांनी आपल्या आरोपात म्हटलं आहे.