मुंबई : बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन करिष्माई नेते... ज्यांची मोहिनी राज्यातील जनतेला नेहमीच पडली. आता या दोन करिष्माई नेत्यांच्या नातवांनी राजकीय रणांगणात प्रथमच पाऊल ठेवलंय. आता ठाकरे आणि पवार कुटुंबीयांतील या भावी नेत्यांवर साऱ्या राज्यातील जनतेचं नक्कीच लक्ष लागून असेल. रोहित पवार आणि आदित्य ठाकरे यांच्या रुपात महाराष्ट्राच्या राजकारणाच्या क्षितीजावर पवार आणि ठाकरे कुटुंबाताली दोन नवे चेहरे उदयाला आले आहेत. एकाच्या नावामागे पवार आणि दुसऱ्याच्या नावामागे ठाकरे नावाचा करिष्मा जरी असला तरी आता या दोघांवर खूप मोठी जबाबदारी असणार आहेत. कारण हे आहेत शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांचे नातू... हे दोघेही तरुण आहेत, सुशिक्षित आहेत आणि त्यांचं आतापर्यंतचं वागणंही खूप सभ्य आणि वडीलधाऱ्यांचा मान राखणारं असं राहिलंय. यामुळेच या दोघांकडूनही जनतेच्या अपेक्षा आता वाढल्या आहेत.
शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे हे दोघे 'दिलदार शत्रू' त्याचबरोबरच 'दिलदार मित्र'ही होते. राजकीय पटलावर या दोघांना एकत्र आणण्याचा एक प्रयत्नही झाला होता. मात्र, त्यावेळी 'आपल्याला दिलदार शत्रू पाहिजे' असं म्हणत बाळासाहेबांचा तो मैत्रीचा हात तेव्हा शरद पवारांनी नम्रपणे नाकारला होता. मात्र, त्या दोघांचे वैयक्तिक संबंध नेहमीच सलोख्याचे राहिले.
आताच्या बदललेल्या राजकीय समीकरणांच्या निमित्तानं पवार आणि ठाकरे हे कुटंबीय आता एकाच पटलावर आले आहेत. आता आपल्या आजोबांच्या दिलदार मैत्रीचा वारसा जपण्याची जबाबदारी या दोघांवर आलीय.
दोघांनी प्रथमच विधानसभेत आमदार म्हणून प्रवेश केला आहे. या दोघांकडे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं भवितव्य म्हणून पाहिलं जातं. त्यामुळे आता या दोघांच्या राजकीय प्रवासाकडे साऱ्या महाराष्ट्राच्या नजरा खिळल्या आहेत.