मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पुर्णाकृती पुतळा गेट वे आँफ इंडिया जवळच्या रिगल सिनेमा सर्कलमध्ये उभारण्यात येणार आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत: जोगेश्वरी इथल्या मातोश्री क्लबमध्ये जाऊन उभारण्यात येणाऱ्या पुतळ्याची पहाणी केली. या पुतळ्याचं अनावरण येत्या २३ जानेवारी रोजी बाळासाहेबांच्या जयंतीच्या दिवशी करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
बाळासाहेबांचा हा पुतळा 9 फूट उंचीचा असून शाडूची माती आणि ब्रॉन्झ धातूपासून साकारण्यात येतो आहे. हा पुतळा शिल्पकार शशिकांत वडके हे साकारत आहेत.
गेल्या ४ वर्षापासून हा प्रस्ताव रेंगाळला होता. पण राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीचं सरकार येताच पुतळा उभारण्यास पुरातत्त्व विभागाने मंजुरी दिली आहे. बाळासाहेब ठाकरे यांचं १७ नोव्हेंबर २०१२ रोजी निधन झालं. महापालिकेच्या स्थायी समितीचे तत्कालीन अध्यक्ष यशोधर फणसे यांनी हा प्रस्तावऑक्टोबर २०१५ मध्ये गटनेत्यांच्या बैठकीत मांडला होता. त्यानंतर तत्कालीन महापौर स्नेहल आंबेकर यांनी याला मंजुरी देऊन तो आयुक्तांकडे पाठवला होता. त्यानंतर हा प्रस्ताव महाराष्ट्र पुरातत्त्व समितीकडे पाठवण्यात आला होता.