यंदा आंब्याचा सीजन उशिरा येणार...

अवकाळी पावसाचा फटका अन्य पिकांप्रमाणेच आंब्यालाही

Updated: Dec 5, 2019, 07:17 PM IST
यंदा आंब्याचा सीजन उशिरा येणार... title=

प्रफुल्‍ल पवार, झी मीडिया, रायगड : एप्रिल-मे महिन्यात आंबे खायचा प्लॅन करत असाल, तर जरा थांबा. अवकाळी पावसाचा फटका अन्य पिकांप्रमाणेच आंब्यालाही बसला आहे. अनेक ठिकाणी अद्याप मोहोरच लागलेला नाही. त्यामुळे यंदा आंबा कमी येईल आणि आलाच तर उशिरा येईल, अशी भीती आहे. 

रायगड जिल्‍हयात सरासरीच्या दीडपट पाऊस झाला. यामुळे आंबा धोक्यात आला आहे. दरवर्षी साधारण 15 नोव्हेंबरपासून मोहर येण्यास सुरुवात होते. मात्र डिसेंबर सुरू झाल्यावरही थंडीचा पत्ता नसल्यानं अद्याप मोहोरच धरलेला नाही. गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा ढगाळ वातावरण आहे. 

मोहोर उशिरा आल्यानं फळं पिकायलाही उशिर होणार आहे. आंबा बाजारात यायला विलंब होणार आहे.त्यामुळे अपेक्षित दर मिळेल का याची धास्ती आहे. 

मोहरावर शेंडा पोखरणारी आळी आणि तुडतुड्यांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी पालवीवर किटकनाशकांची फवारणी करण्याचा सल्ला कृषी विभागानं दिला आहे.

यंदा अवकाळी पावसानं सर्वच राज्यातल्या शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलंय. बागायतींनाही त्याचा फटका बसतो आहे. त्यामुळे यंदा फळांचा राजा उशिरा आणि आभावानंच येईल, अशी शक्यता आहे.