सदोष वीजबील आकारणीमुळे बेस्टला १४० कोटींचा फटका; प्रशासन मात्र ढिम्मच

सदोष वीजआकारणीपोटी बेस्टला वर्षाला १३ कोटी रूपयांचा तोटा होत आहे.

Updated: Jan 24, 2019, 09:58 PM IST
सदोष वीजबील आकारणीमुळे बेस्टला १४० कोटींचा फटका; प्रशासन मात्र ढिम्मच title=

मुंबई: बेस्ट प्रशासनाचे अजूनही भिकेचे डोहाळे संपलेले नाहीत. संगणकीय वीजबील पद्धतीतल्या दोषामुळे बेस्टला गेल्या ७ वर्षात सुमारे १४० कोटी रुपयांचा फटका बसल्याचा अंदाज व्यक्त होतोय. एका सामान्य कर्मचाऱ्याने त्यातील दोष समोर आणूनही  वरिष्ठ अधिकारी याबाबत कोणतीच हालचाल करायला तयार नाहीत. वीज मीटर बदलीनंतरची सदोष वीजआकारणीपोटी बेस्टला वर्षाला १३ कोटी रूपयांचा तोटा होत आहे. मुंबईत बेस्ट प्राधिकरण बससेवेबरोबरच शहर विभागात वीजपुरवठाही करते. सुमारे १० लाख ग्राहक बेस्टची वीज घेतात. मुंबईत दर महिन्याला सुमारे ८ ते १० हजार वीज मीटर बदलले जातात. परंतु या बदलीमध्ये सदोष वीजआकारणी बेस्ट करत असल्यामुळे बेस्टचा तोटा होत आहे. यापैकी काही ग्राहकांच्या वीज बिलांमधील गफलत एका कर्मचाऱ्याने वरिष्ठांच्या नजरेसही आणून दिली. हे केवळ नजरचुकीने एकाच बिलाबाबत झालेले नाही, तर प्रणालीतील दोषामुळे प्रत्येक मीटर बदलीवेळी ब्रोकन डेचा असा घोळ होत आहे. त्यामुळे एका विभागात महिन्याला सरासरी सुमारे १२ लाख रुपयांचा तोटा यामुळं बेस्टला होतोय. एकूण ९ विभागांचा विचार केल्यास महिन्याला १ कोटी रुपयांहून अधिक तर वर्षाला सुमारे १२ ते १३ कोटी रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागतोय. गेल्या सात वर्षांपासून हीच पद्धत सुरू असल्याने आतापर्यंत किमान ८५ ते ९० कोटी रुपयांचा नाहक तोटा बेस्टला झालाय.  

विद्युत कायदा २००३ नुसार बेस्ट गेल्या दोन वर्षांपर्यंतचेच ब्रोकन डेचे पैसे ग्राहकांकडून वसूल करू शकते. परंतु त्यापूर्वीच्या काळातल्या पैशावर मात्र बेस्टला पाणी सोडावे लागणार आहे. एवढे असले तरी किमान या वसुलीला सुरुवात तरी व्हायला हवी. परंतु त्याची सुरुवातच होताना दिसत नाहीय. 

धक्कादायक म्हणजे बेस्टमधल्या एका कर्मचा-याच्या ही गोष्ट लक्षात आली. एका महिन्यातली तशी वसुलीही त्यांने करून दाखवली. परंतु प्रशासनाने त्याची बदली केली. बेस्टचा तोटा कमी करणारा प्रस्ताव त्याने वर्षापूर्वी सादर करूनही प्रशासन मात्र अजूनही ढिम्मच आहे.