मुंबई : राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेने संभाजीराजे छत्रपती यांना शिवसेनेत येण्याची ऑफर दिली होती. मात्र, संभाजीराजे यांनी ती ऑफर नाकारत अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ही निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता निर्माण झाली होती.
संभाजीराजे यांनी ही निवडणूक लढविण्यासाठी अपक्ष आमदारांनी आपणास सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्यानुसार शेकाप आमदार महेंद्र थोरवे यांनी त्यांच्या उमेदवारी अर्जावर सही केली होती.
मात्र, या साऱ्या घडामोडीनंतर संभाजीराजे यांनी निवडणुकीतून अचानक माघार घेतल्याची बातमी समोर येत आहे. याबाबत संभाजीराजे उद्या पत्रकार परिषद घेवून आपली भूमिका जाहीर करणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिलीय.
संभाजीराजे राज्यसभा उमेदवारी अर्ज दाखल करणार नाही असे सूत्रांनी सांगितले आहे. विजयासाठी आवश्यक असलेले संख्याबळ जुळत नसल्याने त्यांनी माघार घेण्याचा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे.
महत्वाचे म्हणजे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी १० अनुमोदक आमदारांची जुळवाजुळव होत नाही हे मुख्य कारण असल्याचे समजतंय. या कारणासाठीच संभाजीराजे यांनी शर्यतीतून माघार घेण्याचा निर्णय घेत असल्याचे सूत्रांनी सांगितलंय.