मुंबई : जवळपास 10 वर्षांपूर्वी घडलेल्या आणि 2015 मध्ये उजेडात आलेल्या शीना बोरा हत्याकांड प्रकरणाने चांगलीच खळबळ उडवून दिली होती. मुळात शीनाची हत्या झाल्याचेच जवळपास चार ते पाच वर्षांनंतर समोर आले होते. याप्रकरणी शीनची आई इंद्राणी मुखर्जी ही प्रमुख आरोपी होती. तर सावत्र वडील पीटर मुखर्जी या हत्याकांडमध्ये मास्टर माईंड मानले जात आहेत. या प्रकरणात आज शीनाबरोबर ज्याचा साखरपुडा झाला त्या राहुल मुखर्जी याचा महत्वपूर्ण जबाब न्यायालयासमोर नोंदवण्यात आला.
पीटर मुखर्जीच्या चेहऱ्यावर चिंता आणि भिती
यावेळी शीनाची आई जिच्यावर शीनाची हत्येचा आरोप आहे ती इंद्राणी मुखर्जी आणि दुसरे आरोपी पीटर मुखर्जी दोघेही उपस्थित होते. राहुल मुखर्जी याचा जबाब या प्रकरणात खूप महत्वाचा मानला जात आहे. न्यायालयासमोर राहुलचा जबाब नोंदवला जात होता. तेव्हा इंद्राणी मुखर्जी आणि पीटर मुखर्जी आरोपींनी बसवतात त्या बाकांवर मागे बसवण्यात आले होते. राहुलचा जबाब सुरू असताना इंद्राणी आणि पीटर दोघेही कागदावर पेनने जबाबतील पॉईंटर्स काढत होते. यावेळी पीटर मुखर्जी अतिशय बारीकपणे आणि गंभीरपणे पॉईंटर्स काढत होते. त्यांच्या चेहऱ्यावर एकप्रकारची चिंता आणि भीती दिसून येत होती.
इंद्राणीच्या चेहऱ्यावर भिती किंवा चिंता नव्हती
तर इंद्राणी मुखर्जी मध्ये मध्ये पॉईंटर्स लिहीत नव्हती. तिच्या चेहऱ्यावर चिंता किंवा भीती दिसत नव्हती. यावेळी इंद्राणीने गुलाबी रंगाचीकॉटनची साडी परिधान केली होती. तिने नेहमीप्रमाणे मेक अप केला होता. तर केस वर बांधले होते. तर पीटर मुखर्जी साधासा कॉटनचा पांढरा शर्ट आणि कॉटनचीच पॅन्ट घातली होती. ते मध्येच महत्वाच्या मुद्द्यावर उभे राहून पॉईंटर्स काढत होते.
काय आहे प्रकरण ?
24 एप्रिल 2012 रोजी शीना बोराची हत्या करण्यात आली होती. इंद्राणीचा चालक शामवर रायला बेकायदेशीर हत्यार बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली. त्याने दिलेल्या धक्कादायक माहितीच्या आधारे इंद्राणीला साल 2015 मध्ये अटक करण्यात आली. इंद्राणीचा पूर्वाश्रमीचा पती संजीव खन्ना आणि शामवर राय यांनी मिळून पहिल्या पतीपासूनची मुलगी शीनाची हत्या केली आणि त्यांच्याच मदतीनं 25 एप्रिल 2012 रोजी तिच्या मृतदेहाची विल्टेवाट लावण्यात आली होती.