मुंबई : फक्त मतांच्या राजकारणासाठी भाजपनं राष्ट्रपतीपदासाठी दलित उमेदवार दिल्याचा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केला आहे. दलित राष्ट्रपती होण्याला हरकत नाही पण त्यानं देशाचं भलं कराव फक्त दलितांचं नाही असंही उद्धव ठाकरे म्हणालेत.
मतांच्या राजकारणासाठी राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवत असाल तर शिवसेनेला ते मान्य नाही असा इशार उद्धव ठाकरेंनी दिला आहे. दरम्यान राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवर शिवसेनेची भूमिका ठरवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी उद्या बैठक बोलावली आहे.
भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत राष्ट्रपतीपदासाठी रामनाथ कोविंद यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना रामनाथ कोविंद यांच्या नावाची घोषणा केली. भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक आज राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराविषयी चर्चा झाली. मागील ३ वर्षापासून ते बिहारचे राज्यपाल आहेत.
राज्यामध्ये मध्यावधी निवडणुकांच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहेत. या चर्चांवरही उद्धव ठाकरेंनी भाष्य केलं आहे. शिवसेना मध्यावधी निवडणुकीसाठी तयार आहे. तुमच्यामध्ये हिंमत असेल तर मध्यावधी निवडणुका घ्या. मध्यावधी निवडणुकांची धमकी देऊ नका अन्यथा शिवसैनिक पेटून उठेल, असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला आहे.
शेतकरी कर्जमाफीसाठी कोणतीही अट नको. हातचं राखून शेतकऱ्यांना काही देऊ नका, असं उद्धव ठाकरे म्हणालेत. शिवसेनेचा आज ५१वा वर्धापन दिन आहे. या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा भाजपला लक्ष्य केलं.