'तो' घोटाळा दडपण्यासाठी विखेंना कॅबिनेट मंत्रिपद- अजित पवार

राधाकृष्ण विखे-पाटील यांनी भाजपला न्यायालयात जाण्याचा इशारा दिला होता.

Updated: Jun 16, 2019, 03:00 PM IST
'तो' घोटाळा दडपण्यासाठी विखेंना कॅबिनेट मंत्रिपद- अजित पवार title=

मुंबई: मुंबईच्या विकास आराखड्यातील (डीपी) घोटाळ्याची आणखी माहिती पुढे येऊ नये, यासाठीच भाजपने राधाकृष्ण विखे-पाटील यांना कॅबिनेट मंत्रीपद दिल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला आहे. पावसाळी अधिवेशनाच्या आदल्या दिवशीच फडणवीस सरकारकडून मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. यावेळी राधाकृष्ण विखे-पाटील यांना सर्वप्रथम कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेण्याचा मान मिळाला. 

यावरून काँग्रेसचे विधानसभेतील पक्षनेते विजय वडेट्टीवर आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपवर हल्ला चढवला. राधाकृष्ण विखे-पाटील विरोधी पक्षनेते असताना त्यांनी मुंबईच्या विकास आराखड्यातील घोटाळ्याविरुद्ध आवाज उठवला होता. मुंबईतील मोठ्या बिल्डरांच्या फायद्यासाठी शहराच्या विकास आराखड्यात जाणीवपूर्वक बदल करण्यात आले. यासाठी तब्बल १० हजार कोटींचा व्यवहार झाला. त्यापैकी पाच हजार कोटींचा पहिला हप्ता भाजपला मिळाला आहे. हे बदल रद्द न झाल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा विखे-पाटील यांनी दिला होता. त्यामुळे आजच्या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपने राधाकृष्ण विखे- पाटील यांना मंत्रिपद दिल्याचा आरोप विरोधकांनी केला.

विकास आराखड्यातील घोटाळ्याचे प्रकरण दडपून टाकण्यासाठी कुठे तोडपाणी झाले, हे आम्हाला माहिती आहे. मात्र, काँग्रेस अधिवेशनात हा मुद्दा लावून धरेल, असे वडेट्टीवार यांनी सांगितले. 

दरम्यान, अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात आलेल्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला. यानंतर विरोधकांनी पत्रकार परिषद घेतली. विरोधी पक्षातल्या आमदारांना फोन करून फोडाफोडी केली जाते. लोकशाहीत हे कितपत योग्य आहे? लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी विरोधी पक्ष जिवंत राहिला पाहिजे. पण त्यालाच यांनी गालबोट लावले आहे. आता सरकारने एक फोडाफोडी खाते काढावे आणि त्याचे मंत्री पद गिरीश महाजन यांना द्यावे, असा टोला यावेळी अजित पवार यांनी हाणला.